

डोंबिवली शहर : डोंबिवली नगरीत सणासुदीच्या काळात विविध कार्यक्रमांची जणू पर्वणीच असते. मात्र यंदा सावित्रीबाई फुले नाट्यगृह दुरुस्तीच्या कारणास्तव बंद असल्याने डोंबिवलीकरांना सांस्कृतिक मेजवानीसाठी वानवा जाणवत आहे. सावित्रीबाई फुले नाट्यगृह गेल्या दोन महिन्यांपासून बंद आहे, तरी दुरुस्तीच्या खर्चाचा अंदाज अजून आलेलाच नाही.
नाट्यगृहातील प्रेक्षागृहाच्या फॉल सीलिंगचा काही भाग 23 मे रोजी कोसळल्यानंतर दुसर्याच दिवशी नाट्यगृह बंद करण्यात आले. त्यानंतर स्ट्रक्चरल तपासणी सुरू करण्यात आली. मात्र, खर्चाचा तपशील अद्याप पूर्ण न झाल्याने दुरुस्ती आणि नूतनीकरणास विलंब होत आहे. एकूण खर्च महापालिकेच्या आवाक्याबाहेर असल्याने, केडीएमसीने राज्य सरकारकडे निधी मागण्यासाठी पत्रव्यवहार केला आहे.
सावित्रीबाई फुले नाट्यगृहाचे बांधकाम जवळपास 20 वर्षांपूर्वी झाले होते. त्यामुळे या ठिकाणी फक्त दुरुस्तीच नव्हे तर नूतनीकरणालाही प्राधान्य देण्याची आवश्यकता आहे. सध्या सुरू असलेल्या अहवाल प्रक्रियेनंतर निधी मिळेल, निविदा निघतील आणि त्यानंतर काम सुरू होईल. त्यामुळे याचे नेमके काम कधी सुरू होईल, आणि पुन्हा रंगमंचावर कधी नाट्यछटा फुलतील, याची काहीही ठोस माहिती नाही.
आगामी श्रावण महिना, मंगळागौर, गणपती, सांस्कृतिक अशा अनेक सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर स्थानिक सांस्कृतिक कार्यक्रम ठरले असले तरी व्यासपीठच मुबलक असल्याने कार्यक्रम कोठे घ्यायचे, हा मोठा प्रश्न उभा राहिला आहे. डोंबिवलीतील अन्य ठिकाणी देखील मर्यादित सुविधा असलेली असल्याने अनेकांना कल्याणमधील आचार्य अत्रे रंगमंदिराकडे वळावे लागत आहे.
सावित्रीचाई फुले नाट्यगृहात दुरुस्तीबरोबरच नूतनीकरणाचे काम करायचे आहे. त्यासाठी लागणार्या खर्चाचा अहवाल बनविला गेला होता. मात्र, काही अतिरिक्त कामांचा समावेश करावा लागल्याने अहवाल नव्याने तयार केला जात आहे. तो अंतिम टप्प्यात असून निधी मिळाल्यानंतर निविदा प्रक्रिया राबवण्यात येईल. लवकरात लवकर काम सुरू करण्याचा प्रयत्न आहे.
रोहिणी लोकरे, कार्यकारी अभियंता, प्रकल्प विभाग, केडीएमसी