

ठाणे/पालघर : दोन महिन्यांच्या मासेमारी बंदीनंतर समुद्रात गेलेल्या मच्छीमारांसाठी यंदाचा हंगाम संमिश्र ठरला आहे. राज्याचा मानबिंदू असलेला ‘राज्यमासा पापलेट’ जाळ्यात कमी लागत असल्याने चिंता वाढली असली, तरी पालघरच्या समुद्रात मुबलक प्रमाणात सापडलेला ‘सरंगा’ आणि रायगडच्या मच्छीमाराला लागलेली ‘घोळ’ माशाची कोट्यवधी रुपयांची लॉटरी यामुळे मच्छीमारांना मोठा दिलासा मिळाला आहे.
मासेमारी बंदीचा कालावधी संपल्यानंतर 1 ऑगस्ट रोजी समुद्रात गेलेल्या बोटी आता किनार्यावर परतू लागल्या आहेत. पहिल्याच फेरीत समाधानकारक उत्पन्न मिळाल्याने मच्छीमारांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. मात्र, मोठ्या आकाराच्या पापलेटच्या कमतरतेमुळे निर्यात आणि दरांवर परिणाम होण्याची शक्यता आहे.
पहिल्या फेरीचे चित्र : उत्पन्न समाधानकारक
उत्पन्न : पारंपरिक पद्धतीने मासेमारी करणार्या प्रत्येक बोटीला 400 ते 1200 किलोपर्यंत पापलेट (सरंगा) मिळाले आहेत.
कमाई : पहिल्याच फेरीत प्रत्येक बोटीला अंदाजे साडेचार लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे, जे गेल्या काही वर्षांच्या तुलनेत समाधानकारक मानले जात आहे.
चिंता : सर्वाधिक उत्पन्न देणारा मोठा पापलेट मात्र दुर्मीळ झाला आहे. जाळ्यात आलेले बहुतांश मासे हे मध्यम (200 ते 400 ग्रॅम) आकाराचे आहेत. यामुळे भविष्यात पापलेटच्या उपलब्धतेबद्दल मच्छीमारांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.
घोळ आणि सरंगा ठरले तारक
घोळ माशाची लॉटरी : रायगडमधील एका मच्छीमाराला ‘सी गोल्ड’ म्हणून ओळखला जाणारा एक मोठा घोळ मासा सापडला, ज्यातून त्याला तब्बल 4 कोटी रुपयांचे जॅकपॉट उत्पन्न मिळाले.
सरंग्याची मुबलकता : पालघरच्या समुद्रात ‘सरंगा’ (छोटा पापलेट) मोठ्या प्रमाणात सापडत आहे. त्यामुळे पापलेटप्रेमी खवय्ये आता सरंग्याला पसंती देत आहेत.