

ठाणे : सहसा ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात उमलणारी सप्तपर्णी ही फुलझाडं यंदा जुलै महिन्यातच ठाणे परिसरात फुलताना दिसत आहेत. निसर्गाच्या नियमित ऋतूचक्रात हा बदल नोंदवला जात असून, तो केवळ नैसर्गिक कुतूहल नाही, तर हवामानातील असंतुलनाचा गंभीर इशारा असल्याचे पर्यावरणतज्ज्ञांचे म्हणणे आहे.
सप्तपर्णी झाडांची फुलण्याची वेळ ही नेहमीच गणपती नंतरची, म्हणजेच ऑक्टोबरच्या प्रारंभी असते. या झाडांची फुले हिरवट-पांढर्या रंगाची असून, त्यांचा विशिष्ट उग्र सुगंध संध्याकाळी व रात्री दरवळतो. शहरातील बगीचे, रस्त्याच्या कडेला किंवा सार्वजनिक संस्थांमध्ये मोठ्या प्रमाणावर ही झाडे लावली जातात. मात्र यंदा पावसाळा सुरू होताच म्हणजेच जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यातच या झाडांनी फुलांची चाहूल दिली आहे. त्यामुळे अनेक नागरिक आश्चर्य व्यक्त करत आहेत.
सप्तपर्णी जुलैमध्ये फुलणे म्हणजेच झाडांना ऋतूचा चुकीचा सिग्नल मिळतो आणि त्यांची फुलण्याची वेळ चुकीच्या टप्प्यावर येते. यामुळे परागसिंचन, फळधारणा आणि जैवविविधतेच्या साखळीत गोंधळ निर्माण होतो.पर्यावरण अभ्यासकांनी या घटनेचा अभ्यास करताना यामागे हवामानातील अनियमितता, तापमानातील चढ-उतार आणि ऋतूचक्रातील गोंधळ हे प्रमुख कारण असल्याचे स्पष्ट होत आहे.
वृक्षशास्त्रज्ञांच्या मते, झाडांना फुलण्यासाठी विशिष्ट तापमान, आर्द्रता आणि प्रकाशमान आवश्यक असते. मात्र गेल्या काही वर्षांपासून जागतिक हवामान बदलामुळे या घटकांमध्ये असमान बदल होत असून, त्यामुळे झाडांचे नैसर्गिक वेळापत्रक ढासळत असल्याची माहिती ज्येष्ठ पर्यावरण तज्ज्ञ डॉ. नागेश टेकाळे यांनी दिले.
या बदलाचा परिणाम केवळ झाडांपुरता मर्यादित राहत नाही, तर पक्षी, कीटक आणि परागकण वाहून नेणार्या प्रजातींच्या जीवनचक्रावरही त्याचा थेट परिणाम होतो. कारण सप्तपर्णीची फुले आणि त्यावर अवलंबून असणारे कीटक हे एकमेकांशी जैविक दृष्टिकोनातून जोडलेले असतात. जर फुले लवकर उमलली, तर कीटकांची वेळ साधली नाही, आणि त्यामुळे संपूर्ण पर्यावरणीय साखळीच विस्कळीत होऊ शकते.
डॉ. नागेश टेकाळे, ज्येष्ठ पर्यावरण तज्ज्ञ