

ठाणे ः माणसाच्या मनामध्ये विकाराने जागा घेतली की बुद्धीचे काही चालत नाही आणि मग ज्ञानाचा प्रकाश दिसण्याऐवजी अंधाराचा विकार होतो तिथे ज्ञानाचा मार्ग खुंटतो. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वरांनी जो ज्ञानयोग सांगितला आहे त्यातून अज्ञान दूर होऊन ज्ञानाचे प्रवेशद्वार आपल्या हाती लागते. असे विवेचन ज्ञानेश्वरीचे अभ्यासक कृष्णा जाधव यांनी मांडले.
माऊली श्री ज्ञानेश्वर महाराज यांच्या 750 व्या जन्मोत्सोव सोहळा सोमवारी ठाण्यात सुरू झाला. “सर्वाभुती सुखरूप- ज्ञानोबा माझा” असा हा कार्यक्रम पुढील पाच दिवस श्री ज्ञानदेव सेवा मंडळ आणि दैनिक पुढारी यांच्या विद्यमाने ज्ञानेश्वर मंदिर येथे संपन्न होणार आहे. ज्ञानेश्वरीचे अभ्यासक कृष्णा जाधव यांचे ज्ञानयोग, कर्मयोग, भक्तियोग या विषयावर प्रवचन आयोजित करण्यात आले आहे.
ज्ञानेश्वरीमधील ओव्या भक्तांसमोर मांडताना कृष्णा जाधव म्हणाले माणसाच्या शरीरामध्ये 14 इंद्रीये काम करतात. यामध्ये बुद्धी आणि मन हे श्रेष्ठ आहे. माणसाच्या एकूण समाजातील वर्तणुकीमध्ये याचा मोठा भाग असतो. “मन करारे रे प्रसन्न” असे संतानी सांगितले आहे. यामागे मनाची शक्तीची अनुभूती संतानी प्रगट केली आहे.
महाभारतातील युद्ध श्रीकृष्णा तुला टाळता आले असते असे जेव्हा उद्धवाने सांगितले, तेव्हा श्रीकृष्णाने सांगितले असे तुला का वाटते, तेव्हा उद्धव म्हणाला हे श्रीकृष्णा महाभारतातील युद्ध होण्याचे मूळ कारण द्युत होेते. जर तू या द्युत खेळाच्या वेळी तिथे असता तर पुढील अनर्थ घडलाच नसता. तेव्हा श्रीकृष्ण म्हणाले, अरे उद्धवा मला धर्म म्हणाले आम्ही जिथे आता चाललो आहोत तिथे केशवा तू येऊ नकोस मला तसे वचन दे, तेव्हा मी धर्माला वचन दिले. पण मी त्याला बजावून सांगितले होते.
जेव्हा तुला काही अडचण येईल तेव्हा तु माझी आठवण कर पण अखेरपर्यंत पाचही पांडवांनी माझी आठवण केली नाही. जेव्हा पांडव सर्व हरले आणि दुर्योधन आणि दुःशासन यांनी द्रौपदीचे वस्त्रहरण सुरू केले तेव्हा पाचही पांडव मान खाली घालून बसले होते. आपल्याला मदत करणारा कुणी नाही हे द्रौपदीने पाहिले तेव्हा माझा धावा केला आणि मी धावून गेलो. या कथेतून एकच आपल्या लक्षात येते हा केशव आपल्या आजुबाजूला बसलेला असतो. सोबत असतो पण त्याची आठवण आपल्याला राहत नाही.
अशावेळी विवेकाची जागा अविवेक बुद्धी घेते आणि ज्ञानाचा मार्ग खुंटतो. तुम्हाला जर सद्वविवेकाने वागायचे असेल तर या केशवाची आठवण ठेवा त्याची सोबत मान्य करा आणि बुद्धी जागृत ठेवून वागा म्हणजे अविवेकाचा प्रसाद मिळणार नाही. या कथेतून ज्ञानमार्ग ज्ञानोबांनी सांगितला आहे.
माणसाने अपल्या आयुष्यात सतत पुण्य केले की त्याच्या वाट्याला सुख येते. माणुसच कशाला तर सर्व जिवमात्राला हा नियम लागू आहे. जेव्हा तुम्ही सुख अनुभवता तेव्हा सुखाची हळुहळु वजाबाकी होत जाते. आणि जेव्हा दुःख भोगता तेव्हा पापाची कर्म कमी होवू लागतात.त्यामुळे सुख आणि दुःख या दोन्हीचे आपण तेवढ्याच मनोभावे स्वागत केले पाहिजे. सुख आहे तिथे दुः ख आहे. दुःख भोगल्याने पुण्याच्या मार्गाला पुढे आपण जातो. आणि सुख भोगल्याने पुण्य कमी करत असतो. आपला हा कर्मयोग आपण स्विकारत असतो. असे सांगताना कृष्णा जाधव म्हणाले.
मनापेक्षा अहंकार मोठा होतो, हा अहंकार माणसाला भरकटवत असतो. मन आणि अहंकार याच्यावर बुध्दीचे नियंत्रण असते, पण मन आणि अहंकाराचे ज्ञानेंद्रिये ऐकतात आणि त्यानुसार कृती करतात. बुध्दी मन आणि अहंकाराला संयमात, काबूत ठेवले तर मन निर्विकार होते आणि चांगली कृती घडते, हा चांगला विचार हाच भगवंत आहे, चांगली कृती हीच श्वाश्वत सत्य असते, असे प्रतिपादन मुंद्रांक जिल्हाधिकारी व ह. भ. प. कृष्णा महाराज जाधव यांनी केले.
ठाण्यातील श्री संत ज्ञानदेव सेवा मंडळ आणि दैनिक पुढारी यांच्या संयुक्त विद्यमाने संत ज्ञानेश्वरांचा 750 वा जन्मोत्सवाच्या निमित्ताने 11 ते 13 ऑगस्ट 2025 रोजी ‘सर्वाभूती सुखरूपा-ज्ञानोबा माझा’ या खास कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात ज्ञानेश्वरीचे अभ्यासक आणि मुद्रांक जिल्हाधिकारी कृष्णा जाधव यांचे ज्ञानयोग, कर्मयोग आणि भक्तीयोग या विषयावर तीन दिवस प्रवचन होणार आहे, त्यातील ज्ञानयोगाचे पहिले प्रवचन सोमवारी झाले. यावेळी श्री संत ज्ञानदेव सेवा मंडळाचे अजित मराठे यांनी ह. भ. प. कृष्णा महाराज जाधव यांचे स्वागत केले. दैनिक पुढारीच्या ठाणे आवृत्तीचे निवासी संपादक शशीकांत सावंत यावेळी उपस्थितीत होते.
संत ज्ञानेश्वर महाराजांच्या 750 वा जन्मोत्सव हा वारकर्यांसाठी आनंदाचा क्षण असल्याचे सांगून जाधव म्हणाले, रूढी परंपरांचा पगडा असलेल्या समाजाला नवनीत देण्याचा दृष्टीने संत ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी प्राकृतात सांगितली. भगवद्गगीता आणि ज्ञानेश्वरी यात रणांगणावर सांगितले तत्वज्ञान आहे. जगात कुठेही रणांगणावर तत्वज्ञान सांगण्यात आलेले नाही. आपले जीवन हेही रणांगणच आहे. आपल्या नातेवाईसोबत कसे लढू, म्हणून अर्जुनाच्या मनात निर्माण झालेली सल दूर करण्यासाठी कृष्णाने त्याला सांगितलेले त्तत्वज्ञान म्हणजे ज्ञानयोग आहे, असे त्यांनी नमूद केले.
आपले शरीर आपण चालवतो, असे प्रत्येकाला वाटते, पण आपले शरीर हे 5 इंद्रिये, 5 कर्म इंद्रीय आणि 4 आंतर इंद्रीय चालवत असतात. मन, चित्त, बुध्दी आणि अंहकार हे ज्ञानेंद्रियांना आज्ञा देतात, मन आणि अंहकार बुध्दीला सुप्त ठेवण्याचा प्रयत्न करतात. तर बुध्दी अंहकार आणि मनाला थोपविण्याचे काम करते, तेव्हा माणसाच्या हातून दुष्कृत्य घडत नाही, सत्ता - संपत्ती माणसाला उनत्त करतात, तर या मनाला खतपाणी घालण्याचेकाम अंहकार करत असतो, कर्माच्या प्रतिक्रियेतून निर्माण होणारे सुख आणि दुःख आपल्याला समजून घेण्याचा चैतन्यरूपी प्रवाह म्हणजे आत्मा असल्याचे जाधव म्हणाले.
राग, लोभ, मद - मोह, मत्सर या भावनावर संयमाने मात करण्यासाठी नामरूपी संजीवन साधन आत्मसात करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. साम्य, समानता हा वारकरी समाजाचा आत्मा आहे. संत ज्ञानेश्वरांनी विश्व हाच धर्म मानल्याचे त्यांनी सांगितले. जाधव यांच्या ज्ञानयोगावरील रसाळ निवेदनाने श्रोते मंत्रमुग्ध झाले.