

शहापूर : समृद्धी महामार्ग प्रकल्पामुळे आता मुंबई-नाशिक जुन्या राष्ट्रीय महामार्गावरील स्थानिक व्यवसायांवर मोठा परिणाम झाला असून महामार्गावरील व्यवसायांना घरघर लागली आहे. या मार्गावर असणारे हॉटेल्स, ढाबे, चहाच्या टपर्या, गॅरेज, भाजी-पाल्याचे स्टॉल आणि अन्य लहान व्यवसाय आता ओस पडले आहेत. अनेकांना आपल्या व्यवसायांवर कुलूप ठोकण्याची वेळ आली आहे.
मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गामुळे वाहनधारक थेट आणि जलद प्रवास करू लागले आहेत. त्यामुळे जुन्या मुंबई-नाशिक महामार्गावरील रहदारीत लक्षणीय घट झाली आहे. विशेषतः शहापूर, कसारा, घोटी, इगतपुरी परिसरात याचा मोठा फटका बसला असून, या मार्गावरील व्यावसायिक आर्थिक संकटात सापडले आहेत.
केवळ हॉटेल किंवा ढाबेच नव्हे तर या महामार्गावरील भाजी विक्रेते, टायर पंक्चरवाले, लहान मोठे गॅरेज, चहा नाश्त्याच्या टपर्या अशा अनेक व्यवसायिकांवर याचा परिणाम झाला आहे. काही ढाबा मालकांनी ग्राहकांच्या अभावामुळे कायमस्वरूपी बंदचा निर्णय घेतला आहे. महामार्गावरील आधुनिक सुविधा व वेगवान प्रवासामुळे वाहन चालक जुन्या नाशिक-महामार्गाकडे बहुधा वळत नाहीत, हे वास्तव नाकारता येत नाही.
स्थानिक व्यावसायिकांच्या म्हणण्यानुसार शासनाने समृद्धी महामार्ग तयार करताना जुन्या महामार्गावरील परिणामाचा विचारच केला नाही. पर्यायी धोरण आखले नाही. यामुळे आम्ही आणि नोकर वर्ग आर्थिक संकटात सापडलो आहोत, असे येथील व्यवसायिकांनी बोलताना सांगितले. पूर्वी रोज 50 ते 60 वाहने थांबत असत, आता 10 गाड्याही थांबत नाहीत. कामगारांना पगार देणंही शक्य नाही, असे सांगताना शहापूरजवळील एका हॉटेलच्या मालकाचे डोळे पाणावले.