

डोंबिवली : पाकिस्तानच्या लष्करी विमानांसह ड्रोन भारताकडून नेस्ताबूत करण्यात आल्याच्या बातम्या दूरचित्रवाहिन्यांवर कल्याण-डोंबिवलीकर गुरूवारी (दि.९) मध्यरात्री उशिरापर्यंत पाहत होते. याचवेळी कल्याण पश्चिमेत आधारवाडी भागात आकाशात तीन ड्रोन फिरत असल्याची अफवा पसरली आणि काहीकाळ या भागातील रहिवाशांमध्ये घबराट पसरली. मात्र, तातडीने तपास करून ही अफवा असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आल्यानंतर साऱ्यांचा जीव भांड्यात पडला.
भारत आणि पाकिस्तानमध्ये गुरूवारी (दि.९) रात्री घमासान झाले. भारतीय लष्कराकडून जोरदार हवाई हल्ले सुरू होते. दूरचित्रवाहिन्यांवरून हे थेट प्रक्षेपण पाहत असताना धडकी भरविणारे भोंग्यांचे आवाज, त्यानंतर हवेतल्या हवेत भारताकडून पाकिस्तानची क्षेपणास्त्रे, ड्रोन नष्ट करण्याची चपळाई, युद्धामुळे उत्तर भारतात बंद करण्यात आलेला वीज पुरवठा, ही सगळी दृश्ये नागरिक पाहत होते. याच वेळी कल्याणमधील काही रहिवाशांना आधारवाडी भागात आकाशामध्ये तीन ड्रोन फिरत असल्याची जाणीव झाली.
कल्याणमध्ये दोन दिवसापूर्वी युद्धसरावाचे प्रशिक्षण जिल्हा आपत्कालीन विभागातर्फे करण्यात आले. यावेळी युद्धाच्या परिस्थितीत रहिवाशांनी कोणती काळजी घ्यावी? या संदर्भात माहिती प्रात्यक्षिकांद्वारे देण्यात आली होती. याच दरम्यान कल्याण पश्चिमेकडील आधारवाडी भागात रात्री १२ ते १२.३० वाजेदरम्यान तीन ड्रोन सदृश्य काही हालचाली आकाशात होत असल्याचे आढळून आले. या हालचाली पाहणाऱ्या रहिवाशांमध्ये काही वेळ घबराट पसरली होती. अनेक कुटुंबे घराबाहेर येऊन आकाशातील या हालचाली आपल्या नजरेने टिपत होते. हे ड्रोन कल्याण शहरावर काही संशयित हालचाली करत असल्याचे वाटल्याने जागरूक रहिवाशांनी तातडीने पोलिसांच्या कंट्रोल क्रमांकावर संपर्क साधला. बाजारपेठ पोलिस ठाण्याच्या हद्दीतून ही माहिती मिळाल्याने अधिकारी आणि गस्ती पोलिसांनी क्षणाचाही विलंब न लावता घटनास्थळी जाऊन पाहणी केली.
या संदर्भातची माहिती पोलिस उपायुक्त अतुल झेंडे यांनाही देण्यात आली. पोलिसांनी बारकाईने अवलोकन केले असता अवकाशात नियमित ये-जा विमाने असल्याचे आढळून आले. त्यातील एक विमान कमी उंचीवरून जात होते. तर दोन विमाने आपल्या नियत मार्गाने इच्छितस्थळी जात असल्याचे निदर्शनास आले. हे ड्रोन नसून ती विमाने असल्याचे समजल्यानंतर बघ्यांनी सुटकेचा निःश्वास सोडला. आपल्या आसपास काही संशयास्पद हालचाली आढळून आल्यास रहिवाशांनी तात्काळ पोलिसांशी संपर्क साधावा. कोणत्याही अफवांवर विश्वास ठेऊ नये, असे आवाहन या पार्श्वभूमीवर पोलिसांनी केले आहे.