

नेवाळी : डोंबिवली अंबरनाथ एमआयडीसी पाईपलाईन महामार्गावरील वसार मार्गे उल्हासनगरकडे जाणाऱ्या रस्त्यावर सध्या मृत्यूचा सापळा निर्माण झाला असून, वाहनचालकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. काही दिवसांपूर्वी एमआयडीसीच्या ठेकेदारामार्फत गटार बांधकामासाठी रस्ता खोदून काम करण्यात आले होते. मात्र काम पूर्ण होऊन महिनाही उलटलेला नसताना गटारावरील भाग खचल्याने मोठे खड्डे निर्माण झाले आहेत. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक धोकादायक बनली आहे.
विशेषतः रात्रीच्या वेळी अपुऱ्या प्रकाशव्यवस्थेमुळे अनेक वाहनचालकांच्या नजरेत खड्ड्यांचा अंदाज येत नसल्याने दुचाकी आणि चारचाकी वाहने थेट तुटलेल्या गटारात अडकत असल्याच्या घटना घडत आहेत. सुदैवाने आतापर्यंत मोठी दुर्घटना टळली असली. तरी कोणत्याही क्षणी गंभीर अपघात होण्याची भीती वाहनचालकांकडून व्यक्त केली जात आहे.
एमआयडीसीकडून महामार्गाचे काँक्रीटीकरण, गटारे आणि इतर पायाभूत सुविधांसाठी कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च केला जात आहे. मात्र प्रत्यक्षात सुरू असलेल्या कामांच्या गुणवत्तेबाबत नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे. गेल्या अनेक वर्षांपासून या महामार्गावरील कामे सुरू असून, अद्यापही ती पूर्णत्वास गेलेली नाहीत. त्यातच नव्याने झालेली कामे काही दिवसांतच खचत असल्याने संबंधित ठेकेदार आणि यंत्रणांच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.