Child health concerns : लहान मुलांमध्ये वाढताहेत मानसिक, शारीरिक आजार

60 ते 70 टक्के लहान मुले सुरक्षित मर्यादेपेक्षा जास्त वेळ मोबाईलच्या स्क्रीनवर घालवतात...
Child health concerns
pudhari photo
Published on
Updated on
ठाणे : प्रवीण सोनावणे

बारा वर्षांचा शुभम शेवाळे (नाव बदलले) याचा मोबाईल पालकांनी काढून घेतल्यामुळे शुभम अचानक आक्रमक होऊन त्याने आई वडिलांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. तो कोणाचेही ऐकण्याच्या मनस्थितीमध्ये नव्हता. त्या अवस्थेत त्याला जेव्हा रुग्णालयात आणले तेव्हा त्याची मानसिक स्थिती पूर्णपणे बिघडलेली होती. डॉक्टरांनी उपचार केल्यानंतर त्याच्या वागण्यात काही प्रमाणात बदल झाला. मात्र शुभमवर अजूनही पालकांना बारीक लक्ष द्यावे लागते. मोबाईलच्या अतिवापरामुळे शुभम सारखी अनेक लहान मुले आज अशाप्रकारच्या शारीरिक आणि विशेष करून मानसिक आजारानेे त्रस्त झाले आहेत.

आजच्या डिजिटल युगात स्क्रीन टाइम हे आपल्या सर्वांसाठी एक महत्त्वाचे आव्हान बनले आहे. स्मार्टफोन, टॅब्लेट आणि इतर इलेक्ट्रॉनिक उपकरणे आपल्या जीवनाचा एक महत्त्वाचा भाग बनली आहेत. त्याचा सर्वाधिक विपरीत परिणाम 12 वर्षापर्यंतच्या मुलांवर होऊ लागला आहे. मोबाईलच्या अतिवापरामुळे मुलांच्या आरोग्यावर नकारात्मक परिणाम होऊ लागला आहे. मुलांच्या स्क्रीन टाइमवर नियंत्रण ठेवणे हे आजच्या पालकांसाठी अवघड काम झाले आहे. अनेक वेळा बळजबरीमुळे पालक मुलांसाठी खलनायक ठरतात. वर दिलेल्या शुभमच्या केसमध्ये असाच काहीसा प्रकार घडला.

सुरुवातीला शुभम हा जास्त वेळ लॅपटॉपवर गेम घालवत होता. त्यानंतर त्याचा हा टाइम वाढतच गेला. त्यानंतर केवळ आवश्यक कामासाठीच तो बेडरूममध्ये बाहेर येऊ लागला. त्याचा लॅपटॉप खराब झाल्यानंतर त्यांनी पालकांचा मोबाईल वापरायला सुरुवात केली आणि कालांतराने तो मोबाईलच्या इतका आहारी गेला की, पालकांनी मोबाईल काढून घेतल्यानंतर त्यांनी थेट मोबाईलसाठी पालकांवर हल्ला केला.

नॅशनल इन्स्टिट्यूट ऑन ड्रग ब्युजच्या अहवालानुसार, किशोरवयीन मुले दररोज 7 तास, 22 मिनिटे स्क्रीनवर घालवतात. तर या संशोधनात शाळेत शिकत असताना वापरल्या जाणार्‍या कॉम्प्युटर स्क्रीन टाइमचा समावेश करण्यात आलेला नाही. बालरोग तज्ज्ञांच्या मते 60 ते 70 टक्के मुले ही सुरक्षित मर्यादेपेक्षा जास्त वेळ मोबाईलच्या स्क्रीनवर घालवतात. अलीकडे एका अभ्यासानुसार लहान मुलांचा स्क्रीन टाईम सरासरी 2 तासांपेक्षा अधिक असल्याचे उघड झाले आहे. ही वेळ सुरक्षित मर्यादेपेक्षा दुप्पट असून मुलांचे मानसिक आणि शारीरिक स्वास्थ बिघडवण्यात महत्वाची भूमिका बजावत आहेत.

ठाण्यातील मानसोपचार तज्ज्ञ आणि सेक्सॉलॉजिस्ट डॉ. शैलेश उमाटे यांच्या म्हणण्यानुसार मुलांशी संपर्क व्हावा यासाठी पालकच लहान मुलांना मोबाईल घेऊन देतात. मात्र मुलांना स्मार्ट फोन घेऊन दिला जात असल्याने या स्मार्टफोन सोबत सर्वच गोष्टी त्यांना मोबाईलवर उपलब्ध होत आहेत. परिणामी त्यांच्या फोनचा वापर जास्त प्रमाणात वाढतो.

डिजिटल उपकरणांचा वापर मर्यादित करा

मुलांना फक्त शैक्षणिक हेतूंसाठी स्क्रीन वापरण्याची परवानगी द्या. तसेच, तुमच्या सवयी बदला आणि मुलांसमोर फोन वापरणे टाळा.

मुलांचा स्क्रीन टाइम कसा कमी होऊ शकतो?

मुलांचा स्क्रीन टाइम कमी करण्यासाठी पालक काही सोप्या आणि प्रभावी पद्धतींचा अवलंब करू शकतात. या पद्धती केवळ मुलांचा स्क्रीन टाइम मर्यादित करत नाहीत, तर त्यांना स्क्रीनला पर्याय म्हणून इतर सर्जनशील कामात गुंतवून ठेवू शकतात.

मुलांना कुटुंबासोबत वेळ घालवण्याची सवय लावा

घरी बोर्ड गेम खेळा, कथा सांगा किंवा त्यांच्याबरोबर स्वयंपाक करा. यामुळे मुलांचा स्क्रीन टाइम तर कमी होईलच पण कुटुंबातील सदस्यांमधला सखोल बंधही निर्माण होईल.

मुलांसोबत कला आणि हस्तकला करा

मुलांना कला आणि हस्तकलांमध्ये गुंतवून ठेवणे हा त्यांचा स्क्रीन टाइम कमी करण्याचा उत्तम मार्ग आहे. त्यांना चित्र काढायला, रंग देण्यास किंवा इतर काही कलाकुसर करायला शिकवा जेणेकरून ते स्क्रीनऐवजी या सर्जनशील कार्यावर लक्ष केंद्रित करू शकतील.

स्वतःमध्येही बदल घडवून आणा

मुलांचा स्क्रीन टाइम कमी करण्यासाठी पालकांनी स्वतः स्क्रीन टाइम नियंत्रित केला पाहिजे. जर पालक स्वत: स्क्रीनसमोर कमी वेळ घालवतात, तर मुले देखील त्याच वर्तनाचा अवलंब करतील.

‘नो स्क्रीन’ डे पाळा

आठवड्यातील एक दिवस ‘नो स्क्रीन’ डे म्हणून पाळा. या दिवसाचा सर्जनशील कार्यात उपयोग करा. या दिवशी मुलांना अशा उपक्रमांमध्ये सहभागी करून घ्या, ज्यासाठी ते या दिवसाची आतुरतेने वाट पाहतात.

निसर्गाच्या संपर्कात राहा

मुलांना बाहेर घेऊन जा, जिथे ते निसर्गाच्या जवळ असू शकतात. उद्यानात फिरणे, डोंगरात ट्रेकिंग करणे किंवा बागेत वेळ घालवणे त्यांच्यासाठी खूप फायदेशीर आहे.

स्क्रीन टाइम सेट करा

मुलांचा स्क्रीन टाइम मर्यादित करण्याचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे त्यांच्यासाठी वेळ मर्यादा सेट करणे. स्क्रीनसाठी दररोज फक्त एक किंवा दोन तास ठेवा. त्यांचा स्क्रीन टाइम कधी सुरू होईल आणि कधी संपेल हे त्यांना स्पष्ट करा.

डिजिटल उपकरणांना पर्याय द्या

स्क्रीनला पर्याय म्हणून मुलांना इतर सर्जनशील काम सुचवा. त्यांना खेळ, पुस्तके वाचणे, चित्रकला आणि इतर कार्यांमध्ये रस वाढवण्यासाठी प्रोत्साहित करा. याव्यतिरिक्त, तुम्ही मुलांना त्यांच्या आवडीनुसार, संगीत, नृत्य किंवा नवीन कौशल्य शिकण्यासारख्या कामात गुंतवून ठेवू शकता.

अभ्यासात रस वाढवा

मुलांना पुस्तके वाचण्यास प्रवृत्त करा. त्यांना मनोरंजक आणि माहितीपूर्ण पुस्तके द्या. जेणेकरून ते अभ्यासाचा आनंद घेऊ शकतील. मुलांना कथा, चित्र पुस्तके आणि माहितीपूर्ण पुस्तकांकडे आकर्षित करून ते अभ्यासावर लक्ष केंद्रित करतील आणि डिजिटल उपकरणांपासून दूर राहतील.

मोबाईलच्या अतिवापरामुळे मानदुखी, डोळ्यांवर ताण, भूक न लागणे, झोप न लागणे असे शारीरिक बदल होत असतात. मुलांच्या मानसिक स्थितीमध्येही बदल होतो. यामध्ये काही मुलांकडून अचानक मोबाईल किंवा लॅपटॉप काढून घेतला तर आक्रमक होणार्‍या मुलांचे प्रमाणही 1 ते 2 टक्के असून मुलांना मात्र उपचारांची गरज निर्माण होते.

डॉ. शैलेश उमाटे, मानसोपचार तज्ज्ञ व सेक्सॉलॉजिस्ट

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news