ठाणे : ठाणेकरांचा प्रवास सुखकर व्हावा, त्यांच्या वेळेची बचत व्हावी यासाठी १२ हजार २०० कोटी रुपये खर्चुन ठाणे अंतर्गत रिंग रेल्वे मेट्रो (वर्तुळाकार मेट्रो) सुरु करण्यास केंद्र शासनाने मंजूरी दिली आहे. हा मेट्रो प्रकल्प २०२९ पर्यंत पूर्ण व्हावा याकरिता राज्य मंत्रिमंडळाच्या आज झालेल्या बैठकीत ठाणे महापालिकेला या मेट्रोसाठी कर्ज घेण्यास मंजुरी देण्यात आली आहे. या निर्णयामुळे वर्तुळाकार मेट्रोच्या रायलादेवी ते बाळकूम नाका या पहिल्या टप्प्याच्या कामाला चालना मिळणार आहे.
ठाण्याचा वाढता विस्तार लक्षात घेऊन ठाणेकरांची वाहतूक कोंडीतून सुटका व्हावी यासाठी ठाणे अंतर्गत रिंग रेल्वे मेट्रोच्या कामाची मुहूर्तमेढ रोवण्यात आली. केंद्राने या प्रकल्पाला १४ ऑगस्ट २०२४ मध्ये मंजुरी दिली. तर राज्य शासनाने १२ हजार २०० कोटींची मंजूरी असलेल्या हा अंतर्गत रिंग रेल्वे मेट्रो प्रकल्प २९ कि.मी. लांबीचा असलेल्या प्रकल्पाला ३० सप्टेंबर २०२४ रोजी मंजुरी दिली आहे. २६ कि.मी. जमिनीवरून तर ३ कि.मी. जमिनी खालून (भूमिगत) ही रेल्वे धावणार आहे. याच्या मार्गिका अंतिम करण्यात आल्या आहेत. एकूण २२ स्थानके उन्नत तर २ स्थानके भूमिगत असणार आहेत. भूमिगत असलेली स्थानके ही जुने ठाणे रेल्वे स्थानक आणि नवीन ठाणे रेल्वे स्थानक यांना जोडणारी असणार आहे. पहिल्या टप्प्यातील रायलादेवी ते बाळकूम नाका या २० किलोमीटर लांबीच्या कामासाठी १४०० रुपये कोटी रुपयांची निविदा काढण्यात आलेली आहे. या मेट्रोला सहा डब्बे असणार आहेत.
ठाणे वर्तुळाकार मेट्रो प्रकल्प, पिंपरी-चिंचवड ते निगडी मेट्रो रेल्वे कॉरीडॉर, स्वारगेट ते कात्रज मेट्रो रेल्वे कॉरीडॉर, वनाज ते चांदणी चौक व रामवाडी ते वाघोली मेट्रो कॉरीडॉर (विठ्ठलवाडी), पुणे मेट्रो मार्ग-४ आणि नळ स्टॉप वारजे माणिकबाग (उप मार्गिका) व नागपूर मेट्रो रेल्वे टप्पा-२ या मेट्रो रेल्वे प्रकल्पांना यापुर्वीच मान्यता देण्यात आली आहे. त्यासाठी घेण्यात येणाऱ्या कर्जाची जबाबदारी स्वीकारण्यास तसेच त्यासाठी आवश्यक करार करण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. या प्रकल्पांना मंजूर केलेल्या मयदित द्वीपक्षीय, बहुपक्षीय वित्तीय संस्था किंवा अन्य संस्थांमार्फत सुलभ व्याज दराचे कर्ज उपलब्ध करून घेता येणार आहे. त्यांना या कर्जाची मुद्दल, व्याज व इतर शुल्क यांची परतफेड करावी लागणार आहे. या कर्जाच्या अनुषंगाने आवश्यकता वाटल्यास शासन हमी देण्यास मान्यता देण्यात आली.
ठाणे अंतर्गत रिंग रेल्वे मेट्रो प्रकल्पामध्ये वागळे इस्टेट, रोडनं. २२, लोकमान्य नगर, पोखरण रोड नं. १, पोखरण रोड नं. २, ग्लॅडी अल्वारिस रोड, हिरानंदानी मिडोज, हिरानंदानी इस्टेट, कोलशेत, बाळकुम, राबोडी, ठाणा कॉलेज रोड, ठाणे स्टेशन या परिसरातून ही अंतर्गत मेट्रो धावणार आहे. सीआरझेडच्या अडचणीमुळे बाळकुम नाका ते रायलादेवी मार्गाची निविदा निघणार आहे. वडवली, कावेसर येथे ठाणे अंतर्गत रिंग रेल्वे मेट्रो प्रकल्पाच्या डेपोचे सर्व्हेक्षण सुरु आहे. डिसेंबर २०२९ पर्यंत काम पूर्ण करण्याचे उद्दीष्ट ठेवण्यात आले आहे. काम सुरु असतांना विविध शासनाचे विभाग, ठाणे महापालिका, पाणीपुरवठा विभाग, मलनिस्सारण, महानगर गॅस, महावितरण या संदर्भातील अडचणींवर मात करण्याकरता सर्व्हेक्षणाचे काम पूर्ण झाले आहे.