

डोंबिवली : ऊसाचा रस काढणाऱ्या मशीनमध्ये हात अडकून कर्मचारी कायमचा अधू झाला, तर अन्य एका घटनेत एका महिलेच्या डोक्याचे केस अडकल्याची घटना समोर आली होती. या घटना ताज्या असतानाच कल्याण पूर्वेतील मोक्याच्या नाक्यांवर ऊस रसाच्या गाड्या अनधिकृतपणे ठाण मांडून आहेत.
चोरीची वीज जोडणी घेऊन बेकायदेशीररित्या चालणाऱ्या या उसाच्या गाड्यांबाबत नागरीकांकडून वारंवार तक्रारी केल्या जात आहेत. परंतु पालिका प्रशासन मात्र या उस रसाच्या गाड्यांवर थातुरमातुर कारवाई करून हा विषय दडपून टाकत असल्याने नागरीकांत आश्चर्ययुक्त संताप व्यक्त केला जात आहे.
कल्याण पूर्वेतील पुणे लिंक रोडवरून लोकग्रामकडे जाणाऱ्या रस्त्यावर सलग ऊस रसाच्या ३ गाड्यांवर २२ जानेवारी रोजी केडीएमसीने कारवाई केली होती. परंतु काही दिवसांच्या फरकानेच या तिन्हीही गाड्यांनी पुन्हा फिरुन त्याच जागेवर ठाण मांडले असल्याचे आढळून येते. अशाच प्रकारे शिवाजी कॉलनी रोड, नुतन ज्ञान मंदीर रोड, काटेमानिवली नाका, वालधुनी उड्डाण पुल या ठिकाणीही ऊस रसाच्या गाड्यांनी मोक्याच्या जागा अडवून वाहतुकीला, तसेच पादचाऱ्यांना अडथळा निर्माण केला आहे.
विशेष म्हणजे या सर्व ऊस रस गाड्यांना अनधिकृतपणे विज पुरवठा होत असल्याचे संबंधीत अधिकाऱ्यांच्या वारंवार निदर्शनास आणून दिले. अशा अनधिकृत विज वापर आणि चोरीकडे संबंधीत अधिकारी सोयीस्कररित्या दुर्लक्ष करत असल्याचे जागृक नागरीक सांगतात. या सर्व गाड्यांमागे एकच मस्टर माईंड असून हा इसम सदर व्यवसाय चालवत असल्याचे सांगितले जाते. या सर्व गाड्यांवर उत्तर भारतीय व्यवसायीकच असल्याचे दिसून येते. अशा अनधिकृत गाड्यांवर केडीएमसी प्रशासनाने एकदाच ठोस कारवाई करून हा विषय कायमचा बंद करावा, अशी या भागातील रहिवाशांची मागणी आहे.