डोंबिवली : कल्याणात एका दुकानात साप शिरल्याने दुकानदार आणि ग्राहकांची पाचावर धारण बसली होती. मण्यार की कवड्या या प्रश्नाने अनेकांची दाणादाण झाली. कारण मण्यार हा जगातील सर्वात जास्त विषारी तर कवड्या हा बिनविषारी असतो. पिवळ्या ठिपक्यांचा असलेला या सापाला सर्पमित्रांनी पकडून जेरबंद केल्यानंतर साऱ्यांनी सुटकेचा निःश्वास सोडला.
साप शिरल्याची माहिती दुकानदाराने वॉर फाऊंडेशनच्या मदत क्रमांकावर संपर्क साधून दिली. सर्पमित्र सतीश बोबडे आणि पार्थ पाठारे हे घटनास्थळी पोहोचले तेव्हा त्यांच्या लक्षात आले दुकानात शिरलेला साप हा अत्यंत दुर्मिळ असा पिवळ्या ठिपक्यांचा कवड्या सर्प आहे. सर्पमित्रांनी या सापाला सुखरूप पकडून कल्याण वन विभागाच्या ताब्यात दिले. पिवळ्या
ठिपक्यांचा कवड्या हा कल्याणमध्ये प्रथमच आढळला आहे. या सापाच्या डोक्यापासून शेपटीपर्यंत वरील भागास रांगेत पिवळे ठिपके असतात. म्हणून त्याला मराठीमध्ये पिवळ्या ठिपक्यांचा कवड्या असे म्हणतात. हा साप दिसायला अतिशय सुंदर असतो. तसेच हा साप पूर्णपणे बिनविषारी असल्यामुळे त्याच्यापासून मानवाला कुठलाही धोका नाही. पकडलेला कवड्या लवकरच वनविभागाच्या परवानगीने निसर्ग मुक्त करण्यात येईल, अशी माहिती वॉर फाऊंडेशनचे अध्यक्ष योगेश कांबळे यांनी दिली.