

ठाणे : राज्यात मुंबई, ठाणे, पुणे, नागपूर, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, कोल्हापूर आदी महानगरांत वाहनांची संख्या झपाट्याने वाढत आहे. यामुळे पार्किंग, वाहतूक कोंडी, अपघात, प्रदूषण आशा अनेक समस्या उद्भवू लागल्या आहेत. पार्किंगचा प्रश्न तर दिवसेंदिवस सर्वच शहरांमध्ये गंभीर होत चालला आहे. लोकसंख्येच्या द़ृष्टीने झपाट्याने विस्तारित होणार्या मुंबई-ठाण्यासारख्या शहरात तब्बल 70 लाखाहून अधिक वाहने आहेत. विशेष म्हणजे त्यात 88 टक्के वाहने खासगी असून सार्वजनिक वाहनांची संख्या 9 टक्क्यांपेक्षा कमी आहे.
वाढत्या वाहनांमुळे पार्किंग व वाहतूक कोंडी या दोन मुख्य समस्या मोठी डोकेदुखी ठरत आहे. पार्किंग समस्या सोडवण्यासाठी मुंबई व ठाणे महानगरात काही धोरण आखण्यात आले आहेत. या धोरणांतर्गत ठाण्यात तीस भूखंड वेगवेगळ्या ठिकाणी राखीव ठेवण्यात आली आहेत. तर मुंबईत दोन ठिकाणी बहुस्तरीय रोबोटिक वाहनतळ उभारणीचे काम सुरू करण्यात आले असून ऑन स्ट्रीट वाहनतळासह 34 ठिकाणी सार्वजनिक पे अँड पार्क वाहनतळ सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. मात्र महापालिकेच्या सार्वजनिक वाहनतळांना अल्प प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र आहे. पे अँड पार्क वाहनतळावर वाहने पार्क करण्याऐवजी नागरिक त्यांची वाहने रस्त्यावर पार्किंग करतात. त्यामुळे पालिकेच्या पार्किंग धोरणाकडे नागरिकच पाठ फिरवत असल्याचे दिसून येते.
पार्किंगचे कोणतेच नियोजन नाही
ठाणे शहरात आजच्या घडीला सोळा लाखांच्या आसपास वाहने आहेत. यामध्ये दुचाकींची संख्या सर्वात अधिक आहे, त्या खालोखाल तीनचाकी आणि चारचाकी वाहनांची संख्या आहे. इतक्या मोठ्या संख्येत वाहन असतांना पार्किंगचे कुठलेही नियोजन नाही. साहजिकच कुठेही पार्किंग केल्यामुळे ठाण्यातील रस्त्यांवर मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होणे ही नित्याची बाब झाली आहे.
पार्किंगच्या भूखंडांवर अतिक्रमण
ठाणे शहरातील वाहतुकीचा शास्त्रीय पद्धतीने सविस्तर अभ्यास करून त्यानुसार वाहतुकीचे नियोजन करण्यासाठी वाहतूक पोलिसांनी पावले उचलली आहेत. त्यासाठी ठाणे वाहतूक पोलिसांनी केंद्र शासनाच्या दिल्ली येथील फरिदाबादमधील इन्स्टिट्यूट ऑफ रोड ट्रॅफिक एज्युकेशन या संस्थेतील तज्ज्ञांची मदत घेतली आहे. परंतु सध्या तरी ठाण्यातील वाहतूक कोंडी फोडण्यात यश आलेले नाही. त्यातच ठाणे महानगरपालिकेने पार्किंगसाठी शहरातील विविध ठिकाणी राखीव ठेवलेल्या अनेक भूखंडावर अतिक्रमण झालेले आहे.
मुंबई-ठाण्यातील वाहतूक कोंडी व उपाययोजना
मुंबईत कोट्यवधी/अब्जावधी रुपयांचे नवे ब्रिज, फ्लायओव्हर उभारणी
पोलिसांनी मार्ग बदल व नियोजन केलेतरीही कोंडी जटिल स्वरूप धारण करत आहे
ठाणे शहरात सुमारे 16.5 लाख वाहने, वाहतूक कोंडीची समस्या
मुंबईत 50 लाख वाहने नोंदणीकृत, 2023 मध्ये 45.37 लाख, तर 2024 मध्ये 47.59 लाख वाहने