Ram Ganesh Gadkari Rangayatan : नूतनीकृत राम गणेश गडकरी रंगायतनचे 15 ऑगस्टला भव्य लोकार्पण

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार लोकार्पण, ज्येष्ठ रंगकर्मी सुहास जोशी यांची प्रमुख उपस्थिती; मान्यवरांची उपस्थिती, 'फोकलोक'चे आयोजन
Gadkari Rangayatan
स्वातंत्र्यदिनी उघडणार गडकरी रंगायतनचा पडदाpudhari photo
Published on
Updated on
Summary

ठळक मुद्दे

  • उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते स्वातंत्र्यदिनी होणार भव्य लोकार्पण सोहळा

  • स्वातंत्र्यदिनी, शुक्रवार १५ ऑगस्ट रोजी सकाळी ११.०० वाजता लाेकार्पण

  • लोकसंगीतावर आधारित युवा कलाकारांचा 'फोकलोक' हा कार्यक्रम होणार

ठाणे : ठाणे शहराचा सांस्कृतिक मानबिंदू असलेल्या राम गणेश गडकरी रंगायतन नाट्यगृहाच्या नूतनीकृत वास्तूचा भव्य लोकार्पण सोहळा राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आणि ज्येष्ठ रंगकर्मी सुहास जोशी यांच्या प्रमुख उपस्थितीत स्वातंत्र्यदिनी, शुक्रवार १५ ऑगस्ट रोजी सकाळी ११.०० वाजता करण्यात येणार आहे. या अविस्मरणीय सोहळ्यासाठी वनमंत्री गणेश नाईक, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, खासदार नरेश म्हस्के, आमदार डॉ. जितेंद्र आव्हाड, आमदार संजय केळकर, आमदार राजेश मोरे, आमदार ॲड. निरंजन डावखरे उपस्थित राहणार आहेत. तसेच, या निमित्ताने, लोकसंगीतावर आधारित युवा कलाकारांचा 'फोकलोक' हा कार्यक्रम होणार आहे.

विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री असताना राम गणेश गडकरी रंगायतन या वास्तूच्या नूतनीकरणासाठी राज्य शासनाकडून ३१ कोटी रुपये उपलब्ध करून दिले होते. या निधीतून, ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्या मार्गदर्शनाखाली, रंगायतनच्या जुन्या झालेल्या वास्तूला बळकटी देऊन सर्व यंत्रणांचे नूतनीकरण केले आहे. १९७८ मध्ये बांधण्यात आलेल्या रंगायतनची १९९८ मध्ये प्रथम मोठ्या प्रमाणावर दुरुस्ती करण्यात आली होती. त्यानंतर आता २६ वर्षांनी नूतनीकरण करण्यात आले आहे.

Gadkari Rangayatan
Gadkari Rangayatan reopening: ठाण्यातील गडकरी रंगायतन कधी सुरू होणार? प्रशांत दामलेंसमोरच अधिकाऱ्यांनी तारीख जाहीर केली

ऑक्टोबर-२०२४ मध्ये नूतनीकरणाचे काम सुरू करण्यात आले. हे काम सुरू करताना आणि कामाच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर रंगभूमीवर कार्यरत असलेले कलाकार, दिग्दर्शक, निमति यांच्याशी महापालिकेने सविस्तर चर्चा व प्रत्यक्ष पाहणीही केली. त्यानुसार, गडकरी रंगायतनचे संपूर्ण रूप पालटून टाकण्यात आले आहे.

इमारतीची संपूर्ण स्ट्रक्चरल दुरुस्ती, इमारतीवरील नवीन शेड, नाट्यगृहामधील संपूर्ण नवीन फ्लोअरिंग, रंगमंचाचे नूतनीकरण, नवीन खुर्चा, नवीन फॉल सिलिंग, नवीन अकॉस्टिक पॅनल, संपूर्ण रंगरंगोटी, नवीन अग्निशमन यंत्रणा, नवीन दरवाजे-खिडक्या, नवीन गालिचा व फर्निचर, समोरील व मागील बाजूच्या दर्शनी बाजूचे सुशोभीकरण, नवीन सुरक्षा केबिन, संपूर्ण वायरिंग आणि विद्युतीकरण नव्याने करणे, नवीन ट्रान्सफॉर्मर व जनरेटर बसविणे, ज्येष्ठ नागरिकांकरिता उद्वाहक (लिफ्ट) बसविणे, रंगमंचावरील लाईट्स व ध्वनी यंत्रणा, नवीन वातानुकूलित यंत्रणा आदी कामे या निधीतून करण्यात आली आहेत.

नांदी आणि फ्लूजन

लोकार्पण सोहळ्यासाठी गडकरी रंगायतन आणि त्यासमोरील पूर्ण रस्ता दोन्ही बाजूंनी सजवण्यात येणार आहे. प्रत्यक्ष कार्यक्रमात ज्येष्ठ शास्त्रीय गायक मुकुंद मराठे यांच्यासह संपदा माने, तन्वी गोरे, शरण्या शेणॉय, धवल भागवत, श्रीकर कुलकर्णी, प्रतीक फणसे हे युवा कलाकार नांदी सादर करणार आहेत. त्यांना केदार भागवत (ऑर्गन) आणि आदित्य पानवलकर (तबला) हे कलाकार वादन साथ करतील. तसेच, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावर नावाजलेले ठाण्यातील मान्यवर कलाकार 'फ्लूजन' हा कलाविष्कार सादर करणार आहेत. त्यात, पं. विवेक सोनार (बासरी), पं. मुकुंदराज देव (तबला), मोहन पेंडसे (व्हायोलीन), किरण वेहेले (कीबोर्ड), अभिषेक प्रभू (बेस गिटार) आणि सचिन नाखवा (ड्रम्स) हे कलाकार सहभागी होणार आहेत.

'फोकलोक' कार्यक्रमाच्या प्रवेशिका रंगायतन येथे मिळणार

नूतनीकृत रंगायतनचा लोकार्पण सोहळा झाल्यानंतर 'फोकलोक' हा लोकसंगीतावर आधारित युवा कलाकारांचा दमदार कार्यक्रम ठाणेकर रसिकांना विनामूल्य पाहता येईल. या कार्यक्रमात, रंगायतनमधील पहिल्या दहा रांगा निमंत्रितांसाठी राखीव असतील. उपलब्ध प्रवेशिकांचे वितरण गुरुवार, १४ ऑगस्ट रोजी दुपारी १२.०० वाजता गडकरी रंगायतनच्या तिकीट खिडकीवर सुरू होईल. या प्रवेशिका विनामूल्य आहेत. प्रथम येणाऱ्यास प्राधान्य या तत्त्वावर प्रवेशिकांचे वितरण होईल. एका व्यक्तीस दोन प्रवेशिका घेता येतील.'फोकलोक' कार्यक्रमाच्या प्रवेशिका रंगायतन येथे मिळणार

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news