

डोंबिवली : ध्वनी प्रदूषण रोखण्यासाठी मशिदींवरील भोंग्यांविरोधी केलेली आंदोलने कायदेशीर होती. राजसैनिकांनी केलेली आंदोलने हिंदुत्वासाठीच होती. मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना याची जाण असावी. उच्च न्यायालयाच्या आदेशांनुसार राजसैनिकांनी कोणतेही बेकायदेशीर कृत्य केले नव्हते. त्यामुळे आंदोलकांवरील सरसकट सर्व गुन्हे मागे घ्यावेत, या मागणीकडे ट्विटद्वारे मनसेचे नेते तथा माजी आमदार राजू पाटील यांनी राज्य सरकारचे लक्ष वेधले आहे.
मशिदींवरील भोंग्यांमुळे होणाऱ्या प्रदूषणाचा मुद्दा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ऐरणीवर आणला होता. या संदर्भात नियमांचे उल्लंघन करणाऱ्या भोंग्यांच्या विरोधात मनसेने आंदोलन केले होते. या आंदोलनांदरम्यान स्थानिक पोलिस ठाण्यांतून दाखल केलेल्या गुन्ह्यांच्या विरोधात मनसेचे नेते तथा माजी आमदार राजू पाटील यांनी सरकारला सर्व गुन्हे मागे घेण्याची मागणी केली आहे. न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत करताना मनसेने केलेले आंदोलन हिंदुत्वासाठी केले होते. मुख्यमंत्री हेच गृहमंत्री आहेत त्यांनाही या संदर्भात जाण आहे, जे केले ते हिंदुत्वासाठी केले.
मशिदींवरील भोंग्यांच्या विरोधात उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानंतर राजू पाटील यांनी न्यायालयाचे आभार मानले. त्यावेळी भोगे खाली उतरविणसाठी आमच्या मनसैनिकांनी आंदोलन केले. मशिदींवरील भोंग्यांमुळे होणाऱ्या प्रदूषणामुळे नियमांचा भंग होत आहे. त्यामुळे नियमांच्या अंमलबजावणीसाठी न्यायालयाने घेतलेला निर्णय योग्यच आहे. आमच्या मनसैनिकांनी हनुमान चालीसा लाऊन आंदोलन केले होते. त्यामुळे आमच्या काही सहकाऱ्यांवर गुन्हे दाखल झाले आहेत. आंदोलकांनी कुठलेही बेकायदेशीर कृत्य केले नव्हते, असाही पुनरूच्चार राजू पाटील यांनी ट्विटद्वारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे लक्ष वेधले आहे. आता राज्य सरकार या संदर्भात काय निर्णय घेणार, याकडे आंदोलन राजसैनिकांच्या नजरा लागल्या आहेत.