

ठाणे : शुभम साळुंके
क्रिकेटच्या पंढरीत टेनिस क्रिकेटचा आनंद घेण्यासाठी यंदा राज ठाकरे उपस्थित राहणार आहेत. डोंबिवली जवळील हेदुटणे येथे स्व. रतन बुवा स्मृती चषक टेनिस क्रिकेट मधील सर्वात मोठी स्पर्धा सुरु आहे. या स्पर्धेत क्रिकेटचा थरार आणि राज ठाकरेंची उपस्थिती लाभणार असल्याने क्रिकेट प्रेमींचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे. मनसेचे जिल्हा संघटक हर्षद पाटील यांनी ठाकरेंच्या या डोंबिवली दौऱ्याची माहिती प्रसिद्ध केली आहे.
क्रिकेटची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या डोंबिवलीत 21 व्या रतन बुवा स्मृती चषक सुरु आहे. राज्यातील अनेक क्रिकेट संघ या स्पर्धेत सहभाग घेत असतात. भारतातील सर्वात लोकप्रिय आणि सर्वाधिक बक्षीस असणारी स्पर्धा म्हणून या स्पर्धेकडे पाहिले जाते. आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू या स्पर्धेत अनेकदा सहभागी झाल्याचे दिसून आले आहे.
जिल्ह्यातील ग्रामीण भागातील तरुणांसाठी क्रिकेटचा वर्ल्ड कप असल्याने खेळाडू या स्पर्धेची आतुरतेनी वाट पाहत असतात. यंदा पाहिल्यांदाच डे - नाईट स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत. 18 फेब्रुवारी पासून सुरुवात झालेल्या या स्पर्धेची सांगता 2 मार्च रोजी होणार आहे. या स्पर्धेत ग्रामीण भागातील तब्बल 48 संघ खेळवले जात आहेत. सुरु असलेल्या या स्पर्धेत लाखोंच्या रोख बक्षिसांसह नौल्यवान वस्तू आणि वाहनांची बक्षीस देखील असतात. त्यामुळे या स्पर्धेत खेळाडूंसह प्रेक्षकांची संख्या देखील लक्षणीय असल्याने दरवर्षी प्रमाणे यंदा देखील दिसून येत आहे. मनसे नेते माजी आमदार प्रमोद (राजू) पाटील यांचे बंधू विनोद रतन पाटील हे टेनिस क्रिकेटचे अध्यक्ष आहेत. यंदा पहिल्यांदा डे नाईट क्रिकेटचा थरार जय दुर्गामाता क्रिकेट संघाच्या वतीने अनुभवायला मिळत आहे. त्यातच मनसे अध्यक्ष राज ठाकरे सहभाग घेत असल्याने प्रेक्षकांसह खेळाडूंची देखील उत्सुकता वाढली आहे.