

मुंबई : ठाणे जिल्ह्यात सोमवारी (दि.23) रोजी रात्रभर पडलेल्या मुसळधार पावसामुळे मुंबईला पाणीपुरवठा करणार्या तलावांत अवघ्या 24 तासात 88 हजार दशलक्ष लिटरने वाढ झाली आहे.
23 जूनला सकाळी सहा वाजता तलावांत 3 लाख 88 हजार दशलक्ष लिटर पाणीसाठा होता. हा पाणीसाठा 24 जूनला सकाळी 6 वाजेपर्यंत 4 लाख 76 हजार दशलक्ष लिटर्सपर्यंत पोहचला आहे.
ठाणे जिल्ह्यातील मोडकसागर, तानसा व मध्य वैतरणा या तीन तलावांच्या पाणलोट क्षेत्रात 113 ते 142 मिमी पाऊस झाला. भातसामध्ये 77 मिमी तर नाशिक जिल्ह्यातील अप्पर वैतरणा तलाव क्षेत्रात 60 मिमी पावसाची नोंद झाली. मागील दोन वर्षांच्या तुलनेत यंदा पाणीसाठा 25 टक्के पेक्षा जास्त असल्यामुळे मुंबईकरांची पाणीटंचाईची चिंता जवळपास मिटली आहे. दरम्यान पावसाचा जोर कायम राहिल्यास जुलैच्या पहिल्या आठवड्यात काही तलाव तुडुंब भरून ओसंडून वाहू लागतील, असा विश्वास पालिकेच्या जल अभियंता विभागातील एका वरिष्ठ अभियंत्याने व्यक्त केला.
मुंबईला पाणीपुरवठा करणार्या तलावांत गेल्या तीन वर्षांच्या तुलनेत यावर्षी जून अखेरीस चांगला पाणीसाठा झाला आहे. त्यामुळे मुंबईची पाणीचिंता दूर झाली आहे.