

बदलापूर : कधी ओव्हहेड वायर तुटल्यामुळे, कधी सिग्नल यंत्रणेतील बिघाडामुळे मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत होत असते. अशातच बुधवारी सकाळी 7 वाजून 10 मि. वांगणी-बदलापूर रेल्वे स्थानकादरम्यान कर्जतकडे जाणार्या डाऊन मार्गावरील रुळाला तडा गेल्यामुळे मध्य रेल्वेची वाहतूक ठप्प झाली होती. अखेर, मध्य रेल्वेने रूळ जोडणीचे काम हाती घेतले. तब्बल दीड तासानंतर लोकलसेवा पूर्ववत सुरू झाली. मात्र त्यामुळे बदलापूर ते कर्जत आणि पुढे पुणे, खोपोलीपर्यंत प्रवास करणार्या प्रवाशांचे प्रचंड हाल झाले.
कर्जत दिशेकडे जाणार्या लोकल उपलब्ध नसल्यामुळे पुन्हा त्या लोकल कर्जतवरून मुंबई सीएसएमटीच्या दिशेने येतानाही मध्य रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले. कर्जत-बदलापूरवरुन मोठ्या संख्येने प्रवासी नोकरीसाठी मुंबईत येत असतात. त्यामुळे सकाळी कामाला जाणार्या लोकांची रेल्वे स्थानकांवर गर्दी वाढत चालली होती. सकाळीच मध्य रेल्वेचे हे विघ्नामुळे प्रवासी रेल्वेच्या कारभारावर संताप व्यक्त करत होते.
कर्जत दिशेकडील वाहतुकीला फटका बसल्यामुळे मुंबईकडून पुण्याकडे जाणार्या अनेक मेल आणि एक्सप्रेस गाड्यानाही उशिराने धावत होत्या. पुण्याहून मुंबईकडे येणारी सिंहगड एक्सप्रेस सर्वात प्रथम सोडण्यात आली या गाडीला कर्जात पासन बदलापूरपर्यंत थांबा देण्यात आला होता. त्यामुळे सिंहगड एक्सप्रेसमधील प्रवाशांनाही मोठा मनस्ताप सहन करावा लागला.
रुळाला तडा गेल्याने कल्याण ते सीएसएमटी आणि कर्जत-खोपोली मार्गावरील लोकल गाड्या खोळंबल्या होत्या. या बिघाडामुळे बदलापूर ते कर्जत दरम्यानच्या स्थानकावर प्रवाशांची मोठी गर्दी जमली होती. एकंदरीत या प्रकारामुळे प्रवाशांचा संताप अनावर झाला होता. काही एक्सप्रेस गाड्यांनाही त्यामुळे उशीर झाला. एका रेल्वे कर्मचार्याला सकाळी पाहणी करताना हा तडा आढळला. त्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.