

Mumbai Local Train Latest News
ठाणे : स्थानकांवर प्रवाशांच्या सोयीसाठी उपलब्ध करून दिलेल्या क्यूआर कोड तिकीट सुविधेचा मोठ्या प्रमाणावर गैरवापर होत असल्याने, ही सुविधा सुरू ठेवायची की बंद करायची, असा प्रश्न आता मध्य रेल्वेसमोर उभा राहिला आहे.
रेल्वे स्थानकांवरील प्रचंड गर्दीत अनेक प्रवासी विनातिकीटच प्रवास करण्याचे धाडस करतात. तिकीट काढायचे नाही, पण फुकट प्रवास मात्र करायचाच, या मानसिकतेमुळे काही प्रवासी गाडीत चढल्यावर किंवा तिकीट तपासनीस जवळ आला की लगेच मोबाईलवर कोड स्कॅन करून तिकीट काढतात. परिणामी, प्रामाणिकपणे आगाऊ तिकीट काढणार्या प्रवाशांची फसवणूक होते.
2016 मध्ये प्रवाशांच्या वेळेची बचत व प्रवास अधिक सुलभ व्हावा, यासाठी रेल्वेने ‘यूटीएस’ मोबाईल प सुरू केले. 2024 मध्ये दररोज तब्बल सहा लाखांहून अधिक प्रवाशांनी या पद्वारे तिकीट काढले. अॅपद्वारे स्थानकावर ठेवलेल्या क्यूआर कोड स्कॅन करून तिकीट घेण्याची सुविधा देण्यात आली होती. मात्र, या सोयीचा गैरफायदा घेत प्रवासी धावत्या गाडीत कोड स्कॅन करतात, हे लक्षात आल्यानंतर रेल्वे प्रशासनाने संबंधित क्यूआर कोड सुविधा बंद केली आहे.
रेल्वेचे स्थिर कोड इंटरनेटवरील विविध संकेतस्थळांवर सहज उपलब्ध असल्याने, तपासनीस गाडीत दाखल होताच काही प्रवासी लगेच कोड स्कॅन करून ऑनलाइन तिकीट काढतात, अशा वारंवार तक्रारी रेल्वेला मिळाल्या होत्या. परिणामी, प्रामाणिक प्रवाशांना तोटा सहन करावा लागत आहे.
गैरवापर कसा होतो?
धावत्या गाडीत कोड स्कॅन करून लगेच तिकीट काढणे
इंटरनेटवर सहज उपलब्ध असलेले स्थिर कोड वापरणे
तपासनीस दिसला की तात्काळ तिकीट काढणे