

डोंबिवली : अबला महिलांवर होणाऱ्या अत्याचारांच्या घटनांमुळे एकीकडे पोलिसांकडून महिलांच्या सुरक्षेसाठी वेगवेगळ्या क्लुप्त्या वापरल्या जात आहेत. तर दुसरीकडे लोकल वा लांब पल्ल्याच्या गाड्यांमध्येही प्रवासी महिला असुरक्षित नसल्याच्या घटना घडत आहेत.
रेल्वे सुरक्षा बलाने पुढाकार घेऊन डोंबिवलीत स्मार्ट सहेली उपक्रम सुरू केला आहे. स्वतःच्या वा सहप्रवासी असलेल्यांच्या सुरक्षेसाठी तातडीची मदत मिळविण्यासाठी 139 क्रमांकाचा वापर करावा, असे रेल्वे सुरक्षा बलाकडून महिला प्रवाशांना आवाहन करण्यात आले आहे. (Indian Railways Meri Saheli)
मध्य रेल्वे मार्गावरील सुरक्षा बलाच्या अंतर्गत असलेल्या डोंबिवली रेल्वे सुरक्षा बलाचे वरिष्ठ निरीक्षक गजेंद्र राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली शनिवारी (दि.28) स्मार्ट सहेली कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात डोंबिवलीच्या ग्रुप ॲडमिन शिवानी, ठाकुर्लीच्या ग्रुप ॲडमिन कामिनी आणि कोपरच्या ग्रुप ॲडमिन संध्या यांचे स्मार्ट सहेली ग्रुप कंट्रोलिंग ऑफिसर पिंकी आणि सुरेखा यांच्या हस्ते स्वागत करण्यात आले. या सर्व महिलांना सुरक्षा बलाचे महिला शिपायांनी सुरक्षेबाबत मार्गदर्शन केले. महिलांना काही अडचण वा संकट आल्यास त्यांना तातडीने मदत मिळविण्यासाठी रेल्वे सुरक्षा बलाच्या 139 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले. या कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या ग्रुप ॲडमिननी आपापल्या समस्या रेल्वे सुरक्षा बलाच्या वरिष्ठांपुढे कथन केल्या. तसेच या संदर्भात चर्चाही करण्यात आली. रेल्वे सुरक्षा बल सक्षम आहे. या बलाची मदत आपण प्रवासा दरम्यान कधीही घेऊ शकता, असा विश्वास उपस्थित महिलांशी संवाद साधताना डोंबिवली सुरक्षा बलाचे वरिष्ठ निरीक्षक गजेंद्र राऊत यांनी व्यक्त केला.