Railway News | कोपर रेल्वे स्थानकावर समस्यांचा उच्चांक

स्वच्छतागृहांसह तिकीट खिडक्यांचा अभाव; अंध-अपंग-वृध्द-महिला प्रवाशांची परवड
डोंबिवली, ठाणे
कोपर स्थानकावर समस्यांचा पाढा वाचल्यानंतर रेल्वे अधिकाऱ्यांसह शिवसैनिकांनी स्थानकाची पाहणी केली.(छाया : बजरंग वाळुंज)
Published on
Updated on

डोंबिवली : मध्य रेल्वेमार्गावर डोंबिवलीला जवळपास लागून असलेल्या कोपर स्थानकाला जणू कुणी वालीच नसल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. समस्यांचा उच्चांक गाठलेल्या या स्थानकात तिकीट खिडक्यांचा अभाव तर आहेच, शिवाय स्वच्छतागृह नसल्याने पुरूषांसह महिला प्रवाशांची मोठी गैरसोय होत असते. या स्थानकावरून दररोज हजारो प्रवासी ये-जा करत असतात. रेल्वेला उत्पन्नाचे स्त्रोत उत्तमोत्तम असतानाही या स्थानकाशी संबंधित अंध, अपंग, वृध्द आणि महिला प्रवाशांना वेगवेगळ्या समस्यांना सामोरे जावे लागत असेल तर मात्र आम्हाला आंदोलनाचे खड्ग उपसावे लागणार असल्याचा इशारा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे डोंबिवली शहरप्रमुख अभिजीत सावंत यांनी रेल्वे अधिकाऱ्यांशी बोलताना दिला.

छोटे स्थानक असूनही मोठे उत्पन्न देणाऱ्या कोपर रेल्वे स्थानकावर प्रवाशांसाठी सुविधा उपलब्ध करून देण्याच्या मागणीसाठी उबाठाचे शहरप्रमुख अभिजीत सावंत यांच्या नेतृत्वाखाली कल्याण ग्रामीणचे उपजिल्हाप्रमुख राहूल भगत, उपशहर प्रमुख सुधाकर वायकोळे, युवासेना उपजिल्हा अधिकारी परेश काळण, विधानसभा अधिकारी आदित्य पाटील, उपशहर युवासेना सुदर्शन जोशी, विभाग अधिकारी प्रणव सावंत, विभाग प्रमुख विनायक गोवलकर, उपविभाग प्रमुख कुणाल पवार, किशोर सोहनी, विलास नायर, शाखाप्रमुख राकेश राणे, अभय दिघे, मंगेश सरमळकर, नारायण गायकवाड आदींच्या शिष्टमंडळाने स्टेशन मास्तर स्नेहा भोईर यांची मंगळवारी भेट घेऊन चर्चा केली. यावेळी शहरप्रमुख अभिजीत सावंत यांनी प्रवाशांच्या भावना व्यक्त करणाऱ्या समस्यांचे निवेदन स्टेशन मास्तर स्नेहा भोईर यांना दिले.

कोपर रेल्वे स्थानक डोंबिवली शहराला लागून असलेले मध्य रेल्वेमार्गावरील महत्त्वाचे स्थानक आहे. विशेष म्हणजे जंक्शन असलेल्या कोपर स्थानकातून वसई, दिवा, पनवेल मार्गावरून लोकलसह लांब पल्ल्यांच्या गाड्यांची रेलचेल सुरू असते. ठाणे-मुंबईसह कसारा-कर्जतच्या दिशेला काम-धंद्यासाठी ये-जा करणाऱ्या प्रवाशांची संख्याही मोठी आहे. या ठिकाणी कोपर पूर्वच्या बाजूने ज्येष्ठ नागरिक तसेच महिलांना प्रवास करण्याकरिता लिफ्टची सोय उपलब्ध नाही. पूर्वेला तिकीट काढण्यासाठी खिडकी उपलब्ध नाही. त्यामुळे सर्व प्रवाशांना पश्चिमेला जाऊन तिकीट काढून पुन्हा पूर्वेला येऊनी तिकीट काढावी लागते.

डोंबिवली, ठाणे
कोपर स्थानकावर समस्यांचा पाढा वाचल्यानंतर उबाठाचे शहरप्रमुख अभिजीत सावंत यांच्यासह शिष्टमंडळाने स्टेशन मास्तर स्नेहा भोईर यांना निवेदन दिले. (छाया : बजरंग वाळुंज)

महिला, ज्येष्ठ नागरिक, लहान मुलांची परवड

स्थानक बांधून बराच वर्षांचा कालावधी लोटला आहे. तथापी सुविधांकडे लक्ष दिले जात नसल्याची प्रवाशांची ओरड आहे. अद्याप या स्थानकावर स्वच्छतागृहांची सुद्धा सोय नाही. पनवेल किंवा वसईहून उतरणाऱ्या प्रवाशांची स्वच्छतागृहांच्या अभावी अडचण होते. खास करून महिला, ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुलांची मोठी परवड होते.

यापूर्वी पण शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाच्या माध्यमातून वारंवार निवेदने देण्यात आली आहेत. प्रवाशांच्या स्वाक्षऱ्यांचे निवेदन देखिल देण्यात आले. रेल्वे प्रशासनाने शक्य तितक्या लवकर कोपर पूर्वेला तिकीट खिडकी, स्थानवर स्वच्छतागृहे, तसेच पूर्वेला लिफ्टची व्यवस्था करावी सोय करावी, आदी मागण्यांचे आश्वासन लेखी स्वरूपात देण्यात यावे. अन्यथा रेल्वे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे गुरूवार १७ एप्रिल रोजी याच स्थानकावर ठिय्या आंदोलन करण्यात येईल, असाही इशारा शहरप्रमुख अभिजीत सावंत यांनी दिला.

या संदर्भात कोपरच्या स्टेशन मास्तर स्नेहा भोईर सकारात्मक प्रतिसाद दिला. स्थानकावर सोयी/सुविधांची वानवा असल्याचे मान्य करून निवेदनाची प्रत वरिष्ठांना पाठवण्यात येईल. शिवाय सोयी आणि सुविधांसाठी आपणही पाठपुरावा करू, असे आश्वासन स्टेशन मास्तर भोईर यांनी दिले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news