

खडवली (ठाणे) : मध्य रेल्वेच्या कल्याण-कसारा मार्गावरील तांत्रिक अडचणीमुळे उपनगरीय लोकलच्या वेळापत्रकाचे तीन तेरा वाजले आहेत. तसेच सेवा विस्कळीत होण्याचे प्रकार वारंवार घडत असल्याने मुंबईत प्रवास करणारे चाकरमानी हैराण झाले आहेत.
कल्याण कसारा मार्गावर रेल्वेच्या फेर्या वाढवल्या नसल्याने शेकडो प्रवाशांना दरवाजाला लटकून प्रवास करावा लागत आहे. वाढत्या गर्दीमुळे या मार्गावर गाडीतून पडून झालेल्या अपघातात अनेकांचे जीव गेले आहेत. गेल्या 10 वर्षात प्रवासी संख्या वाढत असताना एकही लोकल वाढलेली नाही.
प्रवाशांच्या मागण्या पाहता एक्स्प्रेस मालगाडीच्या इंजिनात बिघाड होणे, रेल्वे रूळ तुटणे, सिग्नलमध्ये बिघाड अशा तांत्रिक अडचणी वारंवार येत असल्याने रेल्वेने वेळेवर प्रवास करणे जिकरीचे झाले आहे. त्यामुळे मेल-एक्स्प्रेस करिता स्वतंत्र मार्ग असावा, अशी मागणी होत आहे. कसारा स्थानकातून सकाळी 9च्या दरम्यान मुंबई लोकल वाढवण्याची गरज आहे, यावेळी कसार्यातून मुंबईकडे जाणार्या मेल-एक्स्प्रेस कसारा स्थानकात थांबवल्यास मुंबईमध्ये नोकरीसाठी जाणार्या प्रवाशांना सोयीचे होणार आहे.
रेल्वे प्रशासनाने कसारा लोकल वाढवणे गरजेचे आहे. तसेच एक्स्प्रेससाठीच्या तिसर्या मार्गाचे काम लवकरात लवकर पूर्ण केल्यास उपनगरी लोकलसेवेला अडथळा येणार नाही, कल्याण ते कसारा रेल्वे प्रवासादरम्यान उशिरा धावणार्या लोकल ट्रेन तिसर्या रेल्वे मार्गाबाबत रेल्वेमंत्र्यांची भेट घेऊन निवेदन दिले आहे.
रेल्वे प्रशासनाने कल्याण- कसारा प्रवाशांना येणार्या अडचणी सोडवण्यासाठी सकारात्मक होण्याची गरज असून आसनगाव स्थानकातून सकाळी 8.47 मिनिटांची ठाण्याला जाणारी लोकल दररोज आठ ते दहा मिनिटे उशिरा होत असल्याने मोटरमन अदलाबदलीसाठी सात ते आठ मिनिटे जातात. त्यामुळे लोकल 10 ते 15 मिनिटे उशिरा होते. याचा प्रवाशांना त्रास होतो. यासाठी पायलट स्टाफ उपलब्ध करणे गरजेचे आहे, असे कल्याण -कसारा कर्जत रेल्वे प्रवाशी संघटनेचे अध्यक्ष घनघाव यांनी सांगितले.