

डोंबिवली : पश्चिम डोंबिवलीकडे असलेल्या ५२ चाळ परिसरातील रस्त्यांच्या दुतर्फा स्ट्रीट लाईट नसल्याने या भागात संध्याकाळनंतर काळोखाचे साम्राज्य पसरलेले असते. याचाच गैरफायदा घेऊन गुंड-गुन्हेगार आपला कार्यभाग साधत असतात. गुन्हेगारांकडून होणाऱ्या संभाव्य धोकादायक घटना टाळण्यासाठी या भागातील रस्त्यांच्या दुतर्फा स्ट्रीट लाईट लावून परिसर प्रकाशमान करण्याच्या मागणीकडे मनसेचे ज्येष्ठ नेते तथा डोंबिवली विधानसभा क्षेत्र अध्यक्ष प्रल्हाद म्हात्रे यांनी रेल्वे प्रशासनाचे लक्ष वेधले होते. या मागणीला यश आले असून रेल्वेने हा संपूर्ण परिसर प्रकाशमान करण्यासाठी एलईडीचे १० स्ट्रीट लाईट उभारण्यात येणार असून हे काम लवकरच पूर्ण होणार आहे.
या संदर्भात मध्य रेल्वेच्या विभागीय व्यवस्थापकांचे प्रल्हाद म्हात्रे यांनी २७ एप्रिल रोजी निवेदनाद्वारे लक्ष वेधले होते. ५२ चाळ परिसरात रहदारीचे रस्ते आहेत. रेल्वेकडून या रस्त्यांचे काँक्रिटीकरण करण्यात आले आहे. मात्र डोंबिवली स्टेशनकडे जाणाऱ्या रस्त्यावर, तसेच ठाकुर्ली ब्रिज ते रेल्वे ग्राऊंडपर्यंतच्या रस्त्यावर काही ठिकाणी लावलेले स्ट्रीट लाईट वगळता या भागातील रस्त्यांवर स्ट्रीट लाईट लावण्यात आले नाहीत. ५२ चाळ परिसर निर्मनुष्य असतो. त्यातच काळोखाचे साम्राज्य असल्यामुळे या परिसरात चोर, मवाली, गुंड आणि गुन्हेगारांचा या भागात राबता असतो. रात्रीच्या सुमारास महिलांनाच नव्हे तर पुरूष मंडळींना देखिल अशा रस्त्यांवरून एकटे-दुकटे येणे-जाणे धोक्याचे ठरते. पूर्वी या भागात लुटमारीच्या घटना घडल्या आहेत. तसेच पादचाऱ्यांवर जीवघेण्या हल्ल्यांसह हत्यांच्या घटनाही घडल्या आहेत. स्ट्रीट लाईट नसल्याने रस्त्यांवर पसरलेल्या काळोखात गुन्हेगारांना गुन्हे करण्यासाठी पोषक वातावरण आपोआप तयार झाल्याने या परिसरातील त्रस्त रहिवाशांनी मनसेचे ज्येष्ठ नेते प्रल्हाद म्हात्रे यांचे लक्ष वेधले होते.
रेल्वे ग्राऊंडवर परिसरातील अबाल-वृद्ध आणि खेळाडू मोठ्या संख्येने येत असतात. ५२ चाळींच्या आजूबाजूचा परिसर कचऱ्यामुळे डम्पिंग ग्राऊंड झाला होता. हा सर्व परिसर स्वच्छ व सुंदर करण्यात आला आहे. ठिकठीकाणी स्वच्छता राखण्याबाबतचे फलक लावण्यात आले. ज्येष्ठांना बसण्यासाठी बेंच बसविण्यात आले असून छोट्या झाडांच्या कुंड्या ठेवण्यात आल्या. अशा प्रकारे या संपूर्ण भागाचे आम्ही स्वखर्चाने सुशोभीकरण केल्याचे मनसेचे ज्येष्ठ नेते तथा डोंबिवली विधानसभा क्षेत्र अध्यक्ष प्रल्हाद म्हात्रे यांनी रेल्वे प्रशासनाला दिलेल्या निवेदनात नमूद केले.
६ फेब्रुवारी २०२० रोजी याच रेल्वे ग्राऊंडवर बॅगेत भरलेला मानवी मृतदेह आढळला होता. बाहेर कुठेतरी हत्या करून मृतदेह या भागात आणून टाकण्यात आला होता. १२ जून २०२२ रोजी रेल्वे ग्राऊंडवर असलेल्या खंडराजवळ एका अनोळखी इसमाचा मृतदेह ठेचलेल्या अवस्थेत आढळून आला होता. २४ एप्रिल रोजी रेल्वे ग्राऊंड परिसरात एका महिलेचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळून आला. अद्याप या खुनाचा उलगडा करण्यात पोलिसांना यश आले नाही.
केलेले पाप झाकण्यासाठी निर्मनुष्य आणि ओसाड असलेल्या या परिसराचा गुन्हेगार मंडळी आधार घेतात. एकीकडे पोलिसांना आव्हान देणाऱ्या घटना या भागात घडत असतात. मात्र दुसरीकडे निर्मनुष्य आणि ओसाड परिसराचे सुशोभीकरण (नंदनवन) करणाऱ्या मनसेचे ज्येष्ठ नेते तथा डोंबिवली विधानसभा क्षेत्र अध्यक्ष प्रल्हाद म्हात्रे यांनी गुन्हेगारीच्या वाढत्या घटनांबद्दल चिंता व्यक्त केली आहे. या परिसरातील काळोखाचे साम्राज्य संपुष्टात येताच अशा गुन्हेगारी कृत्यांना नक्कीच आळा बसेल, असाही विश्वास प्रल्हाद म्हात्रे यांनी व्यक्त केला.
मोकळी जागा असल्याने नागरिकांचा वावर आणि वाहनांची रहदारी वाढल्यास या भागातील गुन्हेगारीवर आपोआप नियंत्रण येण्यास मदत होणार आहे. मात्र त्यासाठी रस्त्यांच्या दुतर्फा स्ट्रीट लाईट लावण्याची गरज आहे. अंधाराचा गैरफायदा घेणाऱ्या चोर, मवाली, गुंड, गुन्हेगारांना गुन्हे करण्यासाठी मोकळे रानमिळाले आहे. या भागातील गुन्हेगारी संपुष्टात आणण्यासाठी रस्त्यांच्या दुतर्फा स्ट्रीट लाईट लावण्याची व्यवस्था करावी, या मागणीकडे आपण रेल्वे प्रशासनाचे लक्ष वेधल्याचे प्रल्हाद म्हात्रे यांनी सांगितले. या भागात स्ट्रीट लाईटस् चे १० पोल उभारण्यात येत असून त्यावर शक्तिशाली एलईडी लावण्यात येणार आहे. त्यामुळे संपूर्ण परिसर प्रकाशमान होणार असल्याचे म्हात्रे यांनी सांगितले.