डहाणू-नाशिक रेल्वे मार्गाला केंद्र सरकारने मंजुरी दिली असून 100 किमी मार्गाच्या सर्वेक्षणालाही मंजुरी मिळाली आहे. हा रेल्वे मार्ग डहाणू भागातून त्र्यंबकेश्वरपर्यंतच्या ग्रामीण भागातून विशेषतः आदिवासी भागांना जोडणार असल्यामुळे या भागाचा सर्वांगीण विकास शक्य होणार आहे.
डहाणू-नाशिक रेल्वे मार्गाने जोडल्यामुळे व्यवसायाच्या दृष्टिकोनातून तसेच निर्यातीच्या दृष्टिकोनातून हा मार्ग वरदायी ठरणार आहे. पालघर व नाशिक प्रदेशातील आर्थिक वाढ या मार्गामुळे शक्य आहे. या मार्गामुळे प्रवासाचा वेळ कमी होणार आहे.
डहाणू-नाशिक रेल्वे त्र्यंबकेश्वरपर्यंत जाणार असून त्र्यंबकेश्वर येथून उज्जैनला हाच रेल्वे मार्ग जोडण्याचा प्रयत्न केंद्र सरकार करणार आहे. त्यामुळे ज्योतिर्लिंग पर्यटन रेल्वे मार्गाने जोडले जातील.
डहाणू-नाशिक रेल्वे मार्गामुळे स्थानिक स्तरावर रोजगाराच्या अनेक संधी प्राप्त होणार असून या विकास कामामुळे ग्रामीण भागातील गावांचा व नागरिकांचा जीवनस्तर उंचावण्यास मदत होईल. रेल्वे मार्गाच्या शंभर किलोमीटर स्थान सर्वेक्षणासाठी अडीच कोटी रुपये तरतूद करण्यात आली आहे. या सर्वेक्षणानंतर रेल्वे मार्ग रेल्वे स्थानके यासह भौतिक सुविधा अशा विविध विकासकामांचा एक आराखडा तयार करून तो केंद्राकडे अंतिम मंजुरीसाठी पाठवला जाणार आहे. रेल्वे मार्गामुळे ग्रामीण भागासह पर्यटन स्थळे व देवस्थान जोडली गेल्याने देवस्थान पर्यटनाला चांगली चालना मिळणार आहे.
याचसोबत सर्वेक्षणानंतर रेल्वेमार्ग, रेल्वे स्थानके स्थापन केल्यानंतर रेल्वे स्थानकांच्या परिसरामध्ये व तेथील भागांमध्ये मोठ्या प्रमाणात प्रवासी वर्ग ये-जा करणार आहेत. त्यांच्याशी निगडित सुविधा उपलब्ध होताना रोजगार - स्वयंरोजगार निर्माण होणार आहेत. यातूनच तरुणांसह ग्रामीण भागातील विकासाला वेग येईल.
दिवंगत खासदार चिंतामण वनगा यांचे या रेल्वे मार्गाचे स्वप्न होते. केंद्राकडे आग्रह करून हा मार्ग मंजूर केल्याचा व खासदार वनगा यांनी पाहिलेले हे स्वप्न सत्यात उतरल्याचा आनंद आहे. या मार्गामुळे आदिवासी भागाचा सर्वांगीण विकास होणार आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील रोजगार, स्वयंरोजगार, स्थलांतर, कुपोषण असे प्रश्न सुटणार आहेत. त्यासह ग्रामीण भागाचा आर्थिक स्तर या रेल्वे मार्गामुळे उंचावेल असा ठाम विश्वास आहे. हा मार्ग डहाणू व नाशिक जिल्ह्यासाठी वरदान ठरणार आहे.
डॉ. हेमंत सवरा, खासदार, पालघर जिल्हा