

कसारा : मुंबई विभागात पायाभूत सुविधांच्या विस्तारासाठी मोठा निर्णय घेण्यात आला आहे. आसनगाव ते कसारा दरम्यान तिसऱ्या रेल्वे मार्गिकेचे महत्त्वपूर्ण काम हाती घेण्यासाठी रेल्वे प्रशासनाने ०७ ऑक्टोबर ते १८ ऑक्टोबर दरम्यान तब्बल १२ दिवसांचा विशेष वाहतूक आणि पॉवर ब्लॉक (Mega Block) जाहीर केला आहे. या ब्लॉकमुळे पहिल्या टप्प्यात, म्हणजेच ७ ते ९ ऑक्टोबर दरम्यान कसारा मार्गावरील स्थानिक लोकल सेवा मोठ्या प्रमाणावर प्रभावित होणार आहे. उंबरमाळी, खर्डी आणि कसारा दरम्यान उपनगरीय गाड्यांच्या फेऱ्यांवर मर्यादा येणार असल्याने या मार्गावरून प्रवास करणाऱ्या हजारो चाकरमान्यांना आणि स्थानिक प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागण्याची शक्यता आहे.
अनेक कसारा लोकल रद्द; आसनगाव स्टेशन बनणार तात्पुरते टर्मिनस
रेल्वे प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, ७ आणि ८ ऑक्टोबर रोजी दुपारी ३:३५ ते रात्री ८:३५ वाजेपर्यंत, तर ८ आणि ९ ऑक्टोबरच्या मध्यरात्री १२.३० ते पहाटे ५:३० वाजेपर्यंत अप आणि डाऊन अशा दोन्ही मार्गिकांवर ब्लॉक घेतला जाईल. या कालावधीत सीएसएमटी आणि कसारा दरम्यान धावणाऱ्या ०४ महत्त्वाच्या लोकल फेऱ्या पूर्णपणे रद्द करण्यात आल्या आहेत. याशिवाय दुपारी सुटणाऱ्या ४ लोकल कसाराऐवजी आसनगाव स्थानकापर्यंतच चालवल्या जातील आणि तेथूनच माघारी सोडल्या जातील. त्यामुळे कसारा परिसरातील प्रवाशांना आसनगावपर्यंत जाण्यासाठी रस्ते वाहतुकीसारख्या पर्यायी मार्गांचा अवलंब करावा लागणार आहे. ब्लॉकच्या काळात सीएसएमटीहून कसाऱ्यासाठी दुपारी १२:३० वाजता शेवटची लोकल सुटेल.
प्रवाशांचे वेळापत्रक कोलमडणार
उपनगरीय लोकल सेवेसोबतच लांब पल्ल्याच्या मेल आणि एक्स्प्रेस गाड्यांवरही या मेगाब्लॉकचा मोठा परिणाम दिसून येणार आहे. लोकमान्य टिळक टर्मिनस (LTT) आणि सीएसएमटीवरून बनारस, पाटलीपुत्र, अमृतसर आणि गोरखपूरकडे जाणाऱ्या अनेक महत्त्वाच्या एक्स्प्रेस गाड्यांच्या सुटण्याच्या वेळेत बदल करण्यात आला आहे. तसेच काही एक्स्प्रेस गाड्या इगतपुरी, खर्डी आणि आटगाव स्थानकांवर थांबवून चालवल्या जातील. यामुळे इतरही काही मेल-एक्स्प्रेस गाड्या आपल्या निर्धारित वेळेपेक्षा विलंबाने धावतील. रेल्वे प्रशासनाने प्रवाशांना आपल्या प्रवासाचे नियोजन करण्यापूर्वी बदललेल्या वेळापत्रकाची नोंद घेण्याचे आवाहन केले आहे..
पर्यायी व्यवस्थेसाठी प्रवाशांचे साकडे
दरम्यान १२ दिवसाच्या मेगा ब्लॉक दरम्यान एस टी महामंडळ च्या शहापूर व नाशिक विभागाने आसनगाव, कसारा दरम्यान बस फेऱ्या सुरू कराव्यात त्यामुळे प्रवाशांची गैरसोय दूर होईल व मेगा ब्लॉक दरम्यान खाजगी वाहनातून दुप्पट पैसे घेऊन अवैध्य प्रवासी वाहतूक करणाऱ्यांना चाप बसून प्रवाशांची गैरसोय दूर होईल.परिणामी कल्याण कसारा मार्गांवर ब्लॉक काळात मेल, एक्सप्रेस सोडल्यास त्याला मेल एक्सप्रेस ला आसनगाव ते कसारा दरम्यान सर्व स्थानकात थांबा देण्यात यावा असे साकडे प्रवाशी चाकरमानी यांनी रेल्वे प्रशासनाला घातले आहे.
आसनगाव व कसारा रेल्वे स्थानकाबाहेर अतिरिक्त पोलीस बंदोबस्त कार्यरत करण्याची गरज. दरम्यान बारा दिवसाचे या मेगाब्लॉक दरम्यान बाहेर प्रवाशांची प्रचंड गर्दी होण्याची शक्यता आहे त्यातच त्यातच या ब्लॉग काळात नवरात्र उत्सवात सुरुवात होत असून घाटनदेवी, कळसुबाई, श्रीक्षेत्र वणी या तीर्थस्थळी जाणाऱ्यांची गर्दी सर्वाधिक असते हजारो भाविक कल्याण ठाणे मुंबई येथून वरील तीर्थ स्थळी दर्शना साठी जातं असतात म्हणून प्रवाशा च्या सुरक्षेसाठी महत्वाच्या कसारा रेल्वे स्थानका बाहेर तसेच आसनगाव रेल्वे स्थानका बाहेर अतिरिक्त पोलीस बंदोबस्त असणे गरजेचे आहे.
ब्लॉक दरम्यान कल्याण कसारा मार्गांवर जर मेल एक्सप्रेस धावल्या तर त्यांना आसनगाव ते कसारा दरम्यान सर्व स्थानकावर थांबा दिल्यास प्रवाशाची गैरसोय काही प्रमाणात कमी होईल.
... राजू साळवे .चाकरमानी. प्रवाशी कसारा ते मुंबई