ठाणे-बोरिवली बोगद्याच्या आरएमसी प्रकल्पाला नागरिकांचा विरोध

आरएमसी प्रकल्पामुळे हावरे सिटी रहिवाशांचे आरोग्य धोक्यात
आरएमसी प्रकल्प
आरएमसी प्रकल्पामुळे मोठ्याप्रमाणावर ध्वनी प्रक्षण आणि धुळीचे साम्राज्य पसरत आहे.Pudhari news network

ठाणे : ठाणे ते बोरिवली या भुयारी मार्गाच्या प्रकल्पासाठी घोडबंदर रोडवरील कासारवडवलीच्या बोरीवडे भागातील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाजवळ सिमेंट काँक्रीट तयार करण्यासाठीचा (आरएमसी) मोठा प्रकल्प उभारण्यात आला आहे.

या प्रकल्पामुळे मोठ्याप्रमाणावर ध्वनी प्रक्षण आणि धुळीचे साम्राज्य पसरत असते. त्यामुळे हावरे सिटीचे रहिवासी संतप्त झाले असून त्या नागरिकांनी रविवारी (दि.३०) 'आरएमसी' प्रकल्प बंद करण्याची मागणी करत आंदोलन केले.

त्यावेळी आमदार प्रताप सरनाईक यांनी भेट देऊन नागरिकांचे म्हणणे ऐकून घेतले ठाण्यातील वाहतूककोंडी फोडण्यासाठी आणि वेळेची बचत करण्यासाठी संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातून ठाणे ते बोरिवली असा भुयारी मार्ग उभारण्यात येत आहे. हा मार्ग झाल्यास १५ मिनिटात ठाण्याहून बोरिवली गाठता येणार आहे. या बोगद्याच्या कामाकरिता कासारवडवली येथे हावरे सिटी गृहसंकुलाला लागूनच आरएमसी प्रकल्प सुरू आहे. तसेच संजय गांधी उद्यानाला लागून हा प्रकल्प आहे. या आरएमसी प्रकल्पाचा सर्वाधिक परिणाम हावरे सिटी गृहसंकुलातील रहिवाशांना सहन करावा लागत आहे. या गृहसंकुलात ३० हून अधिक इमारती आहेत. तसेच येथे आठ हजारहून अधिक रहिवाशी राहतात. परिसरात एक शाळा देखील आहे. आरएमसी प्रकल्पात दिवस रात्र कामे सुरू असतात. त्यामुळे रात्री ध्वनी प्रदुषण होत असून रहिवाशांची झोपमोड होऊ लागली आहे.

वन्यजीवांनाही त्रास

ज्येष्ठ नागरिकांना दमा, श्वासोच्छवासाच्या समस्यांचा धोका निर्माण झाला आहे. आरएमसी प्रकल्पात दररोज शेकडो डम्पर राडारोडा घेऊन जात असतात. त्यामुळे धुळीचे साम्राज्य पसरत आहे. याशिवाय, या प्रकल्पापासून काही अंतरावर संजय गांधी राष्ट्रीय उद्यान असून आवाजाचा त्रास वन्यजीवांवर होत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

परिसरातील नागरिकांच्या आरोग्याला धोका

रविवारी हावरे सिटी तसेच परिसरातील गृहसंकुलातील काही रहिवाशांनी इमारतीच्या आवारात उतरुन आरएमसी प्रकल्प बंद करा अशी घोषणाबाजी केली. या आंदोलनात लहान मुले, जेष्ठ नागरिक देखील सहभागी झाले होते. तसेच आरएमसी प्रकल्पामुळे नागरिकांच्या आरोग्याला कसा धोका निर्माण होऊ शकतो, याबाबत माहिती देण्यात आली.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news