कोलकात्यातील आर जी कार मेडिकल कॉलेजमध्ये शुक्रवारी (दि.9) रोजी विद्यार्थीनीवर झालेल्या अमानुष अत्याचार आणि हत्येच्या निषेधार्थ इंडियन मेडिकल असोसिएशनच्या डोंबिवली शाखेने आंदोलन सुरु केले आहे. हे आंदोलन शनिवारी (दि. 17) सकाळी सहा वाजल्यापासून रविवार (दि.18) सुरु ठेवले आहे. यामध्ये आपत्कालीन सेवा वगळता इतर वैद्यकीय सेवा बंद ठेवण्याचे आवाहन केले होते. त्यानंतर आयएमएने शहरात निषेध मोर्चाही काढला होता.
आयएमएने केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत डोंबिवलीतील डॉक्टरांनी बिगर आपत्कालीन सेवा बंद ठेवल्या होत्या. शनिवारी (दि.17) आयएमएने विशेष सर्वसाधारण सभा घेतली होती. या सभेत या घृणास्पद घटनेचा निषेध ठराव संमत करण्यात आला. तसेच आयएमएतर्फे संध्याकाळी निषेध मूक मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. या मोर्चामध्ये आयएमएसह निमा, आयडीए या वैद्यकीय संस्थांच्या व्यतिरिक्त अनेक सामाजिक संस्था आणि नागरिकांनीही उत्स्फूर्त सहभाग घेतला होता.
अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने जवळपास 350 हून अधिक व्यक्तींनी डोंबिवलीतील टिळक चौक चौक ते घरडा सर्कलपर्यंत निषेध फलक आणि मेणबत्ती हाती घेऊन शांततेत मोर्चा काढला काढून निषेध नोंदवला. यावेळी इंडियन मेडिकल असोसिएशनच्या हॉस्पिटल बोर्ड ऑफ इंडियाचे सचिव डॉ. मंगेश पाटे यांनी उपस्थितांना संबोधित केले. या प्रकरणाचा नि:पक्षपाती तपास करून दोषींना कडक शिक्षा व्हावी. तसेच अशा घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी वैद्यकीय विद्यार्थ्यांसह डॉक्टरांच्या संरक्षणासाठी कठोर कायदा करण्याची मागणी डॉ. मंगेश पाटे यांनी केली.