

शुभम साळुंके
नेवाळी : कल्याण शीळ रस्त्यावरील सोनारपाडा गावाजवळ नाल्यात संरक्षक भिंत कोसळली आहे. यामुळे कल्याण शीळ रस्त्यावरील वाहतूक कोंडीचा प्रवासाने त्रस्त वाहनचालकांची चिंता पुन्हा एकदा वाढली आहे. ही संरक्षक भिंत अचानकपणे कोसळली.
अन्नपूर्णा हॉटेल समोर घडलेल्या या घटनेनंतर प्रशासनाने बॅरिकेटिंग करून हात वर केलेत. परंतु या नाल्याच्या कडेला बस स्टॉप देखील उभारण्यात आला असून प्रवासी सार्वजनिक वाहनांची वाट पाहत असताना त्याचा आसरा घेत आहेत. मात्र लोकसभा निवडणुकीआधी लावण्यात आलेले पथदिवे काढल्यानंतर कल्याण शीळ रस्ता सोनारपाडा गावाजवळ अंधारमय झाला आहे. त्यामुळे एकीकडे मेट्रो-12 काम सुरू तर दुसरीकडे संरक्षक भिंत कोसळली आता जर नाल्यात वाहन कोसळली तर जबाबदार कोणाची? असा प्रश्न सर्वसामान्य उपस्थित करत आहेत. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या माध्यमातून संरक्षक भिंतीचे काम करण्यात आले होते. मात्र सुरू असलेले काम पूर्ण होण्याआधीच संरक्षक भिंत कोसळल्याने एमएसआरडीसीच्या कामाच्या दर्जावरच प्रश्न चिन्ह उपस्थित केले जात आहे. सोनारपाडा येथे मेट्रो - 12 चे काम सुरू आहे. त्यातच उभारण्यात आलेले बस स्टॉप देखील रस्त्यावर आले आहेत. आता नाल्यात संरक्षक भिंत कोसळली असल्याने वाहनचालकांची चिंता वाढली आहे. विशेष बाब म्हणजे संरक्षक भिंत बस स्टॉपच्या मागील बाजूची कोसळली असल्याने त्याचा आसरा घेणार्या प्रवाश्यांसाठी देखील धोक्याची घंटा निर्माण झाली आहे. त्यामुळे आधीच अरुंद झालेल्या रस्त्यावरील संरक्षक भिंत कोसळल्याने प्रवासी वाहतूक करणार्या बसेस चालकांना डोळ्यात तेल टाकून रात्री प्रवास करावा लागत आहे. मात्र या कोसळलेल्या भिंतीनंतर प्रशासनासह लोकप्रतिनिधींनी देखील गांभीर्याने दखल घेतली नसल्याने सर्वसामान्य नागरिकांकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे.