ठाणे : एकीकडे ठाणे जिल्ह्याला पावसाने झोडपून काढले असताना दुसर्या बाजूला साथजन्य आजारांचा धोका वाढत आहे. जिल्ह्यात डेंग्यूच्या रुग्णांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असून, जिल्ह्यात मागील तीन आठवड्यात डेंग्यूचे 177 रुग्ण आढळून आले आहेत. गेल्या आठवड्यात 14 ते 21 जुलै यादरम्यान जिल्ह्यात डेंग्यूचे 254 संशयित रुग्ण आढळून आले होते. त्यापैकी 75 रुग्णांना डेंग्यूची लागण झाल्याचे कळते.
ठाणे जिल्ह्यात डेंग्यूच्या रुग्णांमध्ये दिवसेंदिवस वाढ होऊ लागली आहे. जिल्ह्यात 20 जून ते 7 जुलै या कालावधीत डेंग्यूचे 43 रुग्ण तर, 8 जुलै ते 14 जुलै या कालावधीत 59 डेंग्यूचे रुग्ण आढळून आले आहेत. तर 14 जुलै ते 21 जुलै कालावधीत डेंग्यूचे 75 रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे मागील जवळपास महिनाभरात डेंग्यूचे 177 रुग्ण आढळून आले आहेत. यामध्ये डेंग्यूचे सर्वाधिक रुग्ण हे कल्याण शहरात आढळले आहेत. तर मागील आठवड्यात भिवंडी महापालिका क्षेत्रात डेंग्यूचा एकही संशयित किंवा संक्रमित रुग्ण आढळून आला नाही.
ठाणे महापालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात स्वाईन फ्लूच्या रुग्णांवर उपचार करण्या करिता विशेष कक्ष तयार करण्यात आला आहे. याठिकाणी एकूण 19 खाटा सज्ज असून त्यातील 4 खाटा या अतिदक्षता विभागातील असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली. दरम्यान डेंग्यूच्या रुग्णांमध्ये दिवसेंदिवस होणारी वाढ पाहता या रुग्णालयामध्ये स्वाईप टेस्टींगची सुविधा देखील उपलब्ध करण्यात आली आहे.
सध्या डेंग्यूच्या रुग्णांची संख्या बघता रुग्णांना चांगले उपचार मिळावेत यासाठी ठाणे जिल्हा सामान्य रुग्णालयात विशेष खबरदारी घेतली आहे. साथीच्या आजारांनी ग्रस्त रुग्णांसाठी विशेष अद्ययावत कक्ष स्थापन केला आहे. औषध साठा, आपत्कालीन पॅरा मेडिकल टीम सज्ज ठेवण्यात आली आहे.
डेंग्यूचे डास साचलेल्या स्वच्छ पाण्यात तयार होतात. त्यामुळे घरात एसी, फ्रीजखाली साचलेले पाणी, फुलदाण्या, कूलर, कुंड्या, बादल्या, जुने टायर येथे दिवसा पाणी जमा होणार नाही, याची काळजी घ्या.
घरात आणि आजूबाजूला स्वच्छता पाळा.
डेंग्यूचे डास सामान्यतः दिवसाच चावतात, त्यामुळे तुमच्या आजूबाजूला पाणी साचलेल्या ठिकाणी जाणे टाळा.
घरांच्या खिडक्यांना जाळी लावणे, शक्यतो दारे-खिडक्या बंद ठेवणे आणि खूप डास असल्यास त्यांची विल्हेवाट लावायला उपाययोजना करा.