Jai Jawan dropped from Pro Govinda : यंदाच्या ‘प्रो-गोविंदा’ लिगमध्ये जय जवान पथकाला डावलले?

राजकीय ‘थर’ नडला? ठाकरेंच्या विजयी मेळाव्यामध्ये सलामी दिल्याने संधी नाकारल्याचा आरोप
Jai Jawan dropped from Pro Govinda
यंदाच्या ‘प्रो-गोविंदा’ लिगमध्ये जय जवान पथकाला डावलले?pudhari photo
Published on
Updated on

ठाणे : प्रवीण सोनावणे

दहा थरांचा विक्रम करणार्‍या जय जवान गोविंदा पथकाला या वर्षी प्रो-गोविंदा लीगमध्ये संधी नाकारण्यात आली आहे. ठाकरे बंधूच्या मराठी विजयी मेळाव्यामध्ये सलामी दिल्याने राजकीय आकसापोटी ही संधी नाकारण्यात आली असल्याचा आरोप आता जय जवान गोविंदा पथकाकडून करण्यात येत आहे. तर विजयी मेळाव्यापूर्वीच निवड प्रक्रिया पूर्ण झाली असून हे सर्व आरोप निराधार असल्याचा दावा आयोजकांकडून करण्यात आला आहे. स्पर्धेत संधी नाकारण्यात आली असल्याने या गोविंदा पथकाच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्याचा निर्धार मनसेच्या वतीने घेण्यात आला आहे.

राज्य सरकारने दहीहंडी उत्सवाला साहसी खेळाचा दर्जा दिल्यानंतर मंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडून प्रो-गोविंदाचे आयोजन करण्यास सुरुवात केली. यंदाचे हे प्रो-गोविंदाचे 3 रे वर्ष आहे. यंदाच्या पात्रता फेरीनंतर 16 संघ अंतिम फेरीसाठी पात्र ठरले आहेत. येत्या 7 ते 9 ऑगस्टदरम्यान मुंबईतील डोम एसव्हीपी,वरळी येथे ही महाअंतिम स्पर्धा रंगणार आहे. या लीग मध्ये राज्यभरातून आलेल्या 32 गोविंदा पथकांची निवड झाली आहे. केवळ राज्यातच नाही, तर संपूर्ण देशभरात प्रसिद्ध असलेल्या आणि आपल्या नावावर 10 थरांचा विश्वविक्रम करणार्‍या मुंबईच्या जय जवान गोविंदा पथकाला मात्र अपात्र ठरवत या स्पर्धेत संधी नाकारल्याने गोविंदा पथकाच्या वतीने नाराजी व्यक्त केली जात आहे.

या स्पर्धेत सहभाग घेण्यासाठी ऑनलाईन अर्ज भरावा लागतो. मात्र जय जवान गोविंदा पथकाला स्पर्धेत सहभागी होण्यास अर्ज करण्यास फक्त 3 मिनिटांचा उशीर झाल्याने त्यांना अपात्र ठरवत त्यांना स्पर्धेत संधी नाकारण्यात आली. मराठीच्या मुद्द्यावरून मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या एकत्रित मेळाव्या दरम्यान जय जवान पथकाने मानवी मनोरे रचत राज आणि उद्धव ठाकरे यांच्या भूमिकेला पाठिंबा दर्शवल्याने आम्हाला संधी नाकारल्याचा संशय पथकाचे अध्यक्ष संदीप ढवळे यांनी व्यक्त केला आहे. मात्र यंदाच्या गोविंदा उत्सवात आम्ही मराठीचा मुद्दा घेऊनच मैदानात उतरणार.

आमच्या टी-शर्टवरदेखील महाराष्ट्रामध्ये फक्त मराठी हाच मुद्दा असणार,अशी भूमिकादेखील जय जवान गोविंदा पथकाने घेतल्याचे पथकाच्या अध्यक्षांनी स्पष्ट केले आहे. या सर्व प्रकरणात मनसेचे नेते अविनाश जाधव यांनी देखील जय जवान गोविंदा पथकाच्या पाठीशी उभे राहण्याचा निर्णय घेतला आहे. जर खेळाडूंच्या बाबतीत काही चुकीचं घडलं असेल तर ते योग्य नाही. ही मुलं मुंबईची शान आहेत. अशी प्रतिक्रिया अविनाश जाधव यांनी दिली आहे.

जय जवान गोविंदा पथकाला या खेळात संधी दिली गेली नाही तर त्यांचे वजन कमी होणार नाही. त्यांनी जे रेकॉर्ड करून ठेवले आहेत,त्याला हात लावायला अनेकांना अनेक वर्षे जातील. तुम्ही त्यांना संधी दिली नाही तर जय जवान गोविंदा पथक छोटे होईल असे होणार नाही. अशाप्रकारे राजकारण करू नये.

अविनाश जाधव, नेते,मनसे

या स्पर्धेत नवीन पथकांना संधी मिळते ही स्वागतार्ह गोष्ट आहे. मात्र निवड करताना स्पर्धेच्या मूल्यांकनावर निवड होणे आवश्यक आहे. खेळ आणि उत्सव वेगळा असून राजकारण वेगळे आहे. या दोघांची मिसळ करू नये. राजकारण करून संधी डावलणे योग्य नाही.

संदीप ढवळे, अध्यक्ष जय जवान गोविंदा पथक

ही निवड प्रक्रिया पूर्णपणे नियमानुसार करण्यात आली आहे. ज्या 32 संघांनी पहिली नोंदणी केली,त्या 32 संघांना संधी देण्यात आली. जय जवान गोविंदा पथकाचा क्रमांक नोंदणीमध्ये 43 वा होता. बालवीर गोविंदा पथक जे गेल्यावर्षी दुसर्‍या क्रमांकावर होते त्यांचा क्रमांकही 37 होता. आणखी एका पथकाचा नंबर नंतरचा होता या तीन संघांनाही संधी नाकारण्यात आली आहे. ज्यांना संधी मिळाली, त्यातील एक पथक हे दापोलीचे आहे, दोन वसई-विरारमधील आहेत, पालघर वाड्यातील पथकांचादेखील समावेश आहे. मागच्या वर्षी जी सहा पथके होती त्यांचीदेखील संधी हुकली आहे. माझ्या मतदारसंघातील गोविंदा पथकांच्या क्रमांक 33 वा होता, त्यांनादेखील संधी नाकारण्यात आली आहे. विजयी मेळाव्याच्या दोन आठवडे पूर्वीच निवड प्रक्रिया झाली असल्याने हे सर्व आरोप निराधार आहेत.

पूर्वेश सरनाईक, आयोजक, प्रो-गोविंदा लीग

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news