

Pradeep Purnekar Case Update Today
ठाणे : ठाण्यातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे विभागप्रमुख प्रदीप पुर्णेकर यांच्या हत्येप्रकरणी गुरुवारी नवीन माहिती समोर आली आहे. प्रदीप पूर्णेकर यांच्या हत्येचा कट साधारण महिनाभरापूर्वीच रचण्यात आला होता. इतकंच नव्हे तर मारेकऱ्यांनी हत्येपूर्वी एकदा सराव देखील केला होता. गुन्ह्यात वापरलेली बाईक 25 हजारात घेण्यात आल्याची माहितीही समोर आली आहे.
ठाण्यात प्रदीप पूर्णेकर यांच्या हत्येमुळे राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. उद्धव ठाकरे हे गुरुवारी ठाण्यात होते. त्यांनी पूर्णेकर कुटुंबियांची भेट घेत सांत्वन केले. दुसरीकडे ठाणे पोलिसांनीही या प्रकरणाच्या तपासासाठी विशेष तपास पथक (SIT) नेमले आहे. गुन्हे शाखेचे पोलिस उपायुक्त अमरसिंह जाधव यांच्या नेतृत्वाखाली हे पथक काम करणार असून यामध्ये २३ अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.
सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक विश्लेषण आणि संशयितांची चौकशी करून हल्ल्यामागील मुख्य सूत्रधार व कटाचा शोध SIT कडून घेतला जात आहे. ठाणे पोलिसांनी गुरुवारी पहाटे मीरा रोड येथून तीन महिला व दोन पुरुष अशा एकूण पाच जणांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.
आत्तापर्यंतच्या पोलीस तपासात काय उघड झाले?
> प्रदीप पुर्णेकर यांच्या हत्येचा कट महिनाभरापूर्वीच रचण्यात आला होता. या कटातील मुख्य सूत्रधाराची राजकीय पार्श्वभूमीवर आहे.
> हत्येसाठी वापरलेली दुचाकी पोलिसांना सापडणार नाही, असा मारेकऱ्यांचा प्लान होता.
> हत्येतील आरोपी नितेश पवार उर्फ भावड्या याने पांढऱ्या रंगाची दुचाकी त्याचा मित्र आकाश मोकाशी याच्याकडून गाडी घेतली होती. तर आकाश मोकाशीने त्याची मैत्रीण भक्ती शिंदे - राणे हिच्याकडून घेतली होती
> काळ्या रंगाची बाईक फरार आरोपी निखिल यादवने ठाण्यातून विकत घेतली होती. त्याने एक महिन्यांपूर्वीच 25 हजार रुपयांमध्ये ही बाईक विकत घेतली होती. मुंब्र्यातील एका व्यक्तीने 12 हजार रुपयांत ही बाईक ठाण्यातील दुकानदाराकडे विकली होती. हीच गाडी निखिलने विकत घेतली.
> हत्येनंतर आरोपींनी दोन्ही गाड्या ठाण्यातील समता नगर येथे सोडल्या आणि पळून गेले.