

ठाणे: प्रदीप पूर्णेकर हत्याप्रकरणाचा तपास महिनाभर उलटूनही निर्णायक टप्प्यावर पोहोचलेला नसल्याने आता ठाणे पोलीस दलातच नाराजीचे वातावरण असल्याची चर्चा आहे. मुख्य सूत्रधारांना अद्याप अटक का नाही, असा सवाल पूर्णेकर कुटुंबीयांसह नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
सोशल मीडियावर ठाणे पोलिसांच्या तपासावर आणि कथित राजकीय दबावावर जोरदार टीका होत असल्याने पोलीस दलाची प्रतिमा डागाळत असल्याची खंत काही वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांकडून खासगीत व्यक्त केली जात आहे.
ठाण्यातील उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे विभागप्रमुख प्रदीप पूर्णेकर यांच्या हत्येला एक महिना उलटला आहे. मात्र, या हत्येमागील कथित मुख्य सूत्रधारांचा शोध आणि त्यांच्यावरील कारवाईचा प्रश्न अद्याप कायम आहे.
मुख्य सूत्रधारांना अटक करण्याची मागणी पूर्णेकर कुटुंबीयांनी लावून धरली असून, यासाठी वारंवार मोर्चे आणि आंदोलनेही करण्यात आली आहेत. त्यामुळे हे प्रकरण आता केवळ एका हत्येपुरते मर्यादित न राहता राज्यभर चर्चेचा विषय बनले आहे.
या प्रकरणातील पुरावे समोर असतानाही पोलीस राजकीय दबावाखाली काम करीत असल्याचा आणि मुख्य सूत्रधारांना वाचविण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप सोशल मीडियावर केला जात आहे. या आरोपांची सत्यता अद्याप सिद्ध झालेली नसली, तरी पोलिसांच्या तपासावर नागरिकांकडून प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
पूर्णेकर यांना न्याय मिळावा, मुख्य सूत्रधारांना अटक व्हावी, अशी मागणी सोशल मीडियावर सातत्याने जोर धरत आहे. विशेष म्हणजे, या प्रकरणामुळे संपूर्ण पोलीस दलाला टीकेला सामोरे जावे लागत असल्याची भावना काही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी खासगीत व्यक्त केल्याचे समजते.
एखाद्या विशिष्ट गुन्ह्याच्या तपासावरून संपूर्ण पोलीस दलाची प्रतिमा मलिन होणे योग्य नसल्याची नाराजी पोलीस कर्मचाऱ्यांमध्येही आहे. जनतेच्या सुरक्षेसाठी रात्रंदिवस कर्तव्य बजावणाऱ्या पोलिसांवर एका प्रकरणामुळे होणारी टीका अस्वस्थ करणारी असल्याची भावना व्यक्त होत आहे.
जनतेचा विश्वास पुन्हा संपादन करण्याचे मोठे आव्हान
या नाराजीपेक्षाही महत्त्वाचा प्रश्न म्हणजे प्रदीप पूर्णेकर यांच्या हत्येचा तपास नेमका कुठपर्यंत पोहोचला आहे आणि मुख्य सूत्रधारांवरील कारवाई कधी होणार? कुटुंबीयांचा आक्रोश, नागरिकांचे आंदोलन आणि सोशल मीडियावरील संताप यामुळे ठाणे पोलिसांसमोर तपासातील पारदर्शकता आणि जनतेचा विश्वास पुन्हा संपादन करण्याचे मोठे आव्हान उभे राहिले आहे.
पोलीस दलाची प्रतिमा वाचविण्यापेक्षा हत्येचा संपूर्ण उलगडा करून दोषींना कायद्याच्या कचाट्यात आणणे, हीच आता पोलिसांसमोरील खरी कसोटी ठरणार आहे.