डोंबिवली : कल्याण-डोंबिवलीत विधानसभा मतदार संघांत मतदानाच्या दिवशी मतदान केंद्रांवर नियुक्त अधिकारी-कर्मचाऱ्यांसह पोलिसांच्या टपाली मतदानास गुरूवारपासून प्रारंभ झाला. कल्याण ग्रामीण विधानसभा मतदार संघात मतदानाच्या दिवशी मतदान केंद्रांवर नियुक्त अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या टपाली मतदान प्रक्रियेस डोंबिवलीतील सिस्टर निवेदिता हायस्कूलमध्ये दुसऱ्या प्रशिक्षणाच्या वेळी प्रारंभ करण्यात आला.
बुधवारी टपाली मतदान करु न शकलेल्या उर्वरित अधिकारी व कर्मचाऱ्यांना 17, 18 व 19 नोव्हेंबर रोजी टपाली मतदानाद्वारे आपले मत डोंबिवलीतील सावित्रीबाई फुले कलामंदिरात असलेल्या सुविधा केंद्रात (FC) नोंदविता येणार आहे. तसेच 14 ते 16 नोव्हेंबर दरम्यान अत्यावश्यक सेवेतील पोलिस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी टपाली मतदानाची सुविधा सावित्रीबाई फुले कलामंदिरातील टपाली मतदान केंद्रात (PVC) उपलब्ध आहे.
टपाली मतदान प्रक्रियेत कल्याण ग्रामीण विधानसभा मतदार संघाचे निवडणूक निर्णय अधिकारी विश्वास गुजर, तसेच सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी श्रध्दा चव्हाण, संजय भोये आणि निवडणूक नायब तहसीलदार सुरेश महाला यांनी टपाली मतदानाद्वारे आपला मतदानाचा हक्क बजाविला.
गुरूवारी सायंकाळी निवडणूक कर्तव्यावरील 172 अधिकारी व कर्मचाऱ्यांनी आपला टपाली मतदानाद्वारे मतदानाचा हक्क बजाविला. टपाली मतदान केंद्रात अत्यावश्यक सेवेतील 224 अधिकारी व कर्मचाऱ्यांनी टपाली मतदानाद्वारे आपला मतदानाचा हक्क बजाविला. बुधवारी 20 नोव्हेंबर रोजी संपन्न होणाऱ्या सार्वत्रिक विधानसभा मतदानाच्या दिवशी सर्व मतदारांनी आवर्जून मतदान करून आपल्या मतदानाचा हक्क बजावावा, असे आवाहन निवडणूक निर्णय अधिकारी विश्वास गुजर यांनी केले.