

कल्याण : यंदाच्या गणेशोत्सवासाठी उच्च न्यायालयाने पीओपी मूर्तीना परवानगी देत सहा फुटापर्यंतच्या पीओपीच्या मूर्ती कृत्रिम तलावात विसर्जन करण्याचे निर्देश दिले असताना मात्र केडीएमसी बांधकाम विभाग कृत्रिम तलावात किती फुटाच्या प्लास्टर ऑफ पॅरिसच्या गणेश मूर्तीचे विसर्जन करावे याबाबत द्विधा मन:स्थितीत सापडले आहेत.
पीओपी मूर्तींच्या विसर्जनाबाबत शासनाकडून अद्यापपर्यंत गाईड लाईन मिळाली नसल्याची धक्कादायक माहिती पालिकेच्या सिटी इंजिनियर यांनी दिली. तर दुसरीकडे पालिका क्षेत्रातील गणेश विसर्जनाच्या व्यवस्थेच्या आवश्यक कामासाठी कोट्यवधी रुपयांच्या 105 कामाच्या निविदा काढणार्या पालिकेच्या बांधकाम विभागाला न्यायालयाने निर्देशित केलेल्या आदेशाची अंमलबजावणी करण्यासाठी शासनाच्या गाईड लाईनची वाट पाहावी लागत आहे.
अवघ्या वीस दिवसांवर गणेशोत्सवाला सुरुवात होणार असून हा उत्सव व्यवस्थित पार पडावा यासाठी कल्याण डोंबिवली महापालिका प्रशासन तयारीला लागले आहे. यंदाच्या गणेशोत्सवासाठी उच्च न्यायालयाने पीओपी गणेशमूतीर्र्ंना परवानगी देत सहा फुटापर्यंतच्या पीओपीच्या मूर्ती कृत्रिम तलावात विसर्जन करण्याचे निर्देश दिले आहेत. तर पीओपीच्या उंच गणेश मूर्तींचे विसर्जन समुद्रांमध्ये करण्याची परवानगी दिली आहे.
यंदा प्लास्टर ऑफ पॅरिसच्या गणेश मूर्तींना परवानगी दिल्याने पालिकेने कृत्रिम तलावाच्या संख्येत वाढ करणे आवश्यक असताना मात्र महानगर पालिकेने नव्याने दोन ते तीन कृत्रिम तलावाची वाढ केली आहे.
सहा फुटांपर्यंतच्या पीओपी गणेश मूर्तीचे विसर्जन करण्याचे निर्देश न्यायालयाने दिले असल्याने सहा फुटापर्यंतच्या गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यासाठी किती कृत्रिम तलावाची व्यवस्था केली आहे, याबाबत पालिकेच्या शहर अभियंता अनिता परदेशी यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी पीओपी मूर्तीच्या विसर्जना बाबत शासनाकडून अद्यापपर्यंत गाईड लाईन मिळाली नसल्याची धक्कादायक माहिती दिली आहे.
महापालिका क्षेत्रात गणेश विसर्जनाची व्यवस्था
कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रातील दहा प्रभागातील गणेश मूर्तीच्या विसर्जन व्यवस्थेसाठी पालिका प्रशासनाने कल्याणात नैसर्गिक स्रोत असलेल्या तलाव, नदी व गणेश घाट विसर्जन - 22, कृत्रिम तलाव - 5, सिन्टेक्स टाकी - 32, फिरते विसर्जन, विसर्जन आपल्या दारी - 6 अशी 65 विसर्जन स्थळे तर डोंबिवलीत तलाव, नदी व गणेश घाट विसर्जन - 30, कृत्रिम तलाव - 1, सिन्टेक्स टाकी - 30, फिरते विसर्जन-विसर्जन आपल्या दारी -4 असे 65 विसर्जन स्थळे व डोंबिवली एमआयडीसी विभागात एक मोठा हौद अशा विसर्जन स्थळांवर गणेश विसर्जनाची व्यवस्था केल्याची माहिती पालिका सूत्रांनी दिली.
कल्याण डोंबिवली महानगर पालिकेने पालिका क्षेत्रातील श्री गणेशोत्सव, नवरात्रौत्सव व इतर सार्वजनिक उत्सवांकरिता पालिका क्षेत्रातील दहा प्रभागात श्री गणेश व दुर्गा देवी मूर्तींच्या विसर्जनासाठी मूर्ती विसर्जन स्थळी बॅरीकेटींग, मंडप व्यवस्था, स्टेज, खुर्ची, मशिनरी पुरविणे, कृत्रिम तलाव उभारणे तसेच गणेश विसर्जन स्थळी गणेशभक्तांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत असते त्या ठिकाणी कुठलीही दुर्घटना होऊ नये तसेच कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी बांधकाम विभागाकडून
10 लाख रुपयेपेक्षा कमी रकमेच्या 98 कामाची पेटी टेंडर व 10 लाख रुपये लाख रुपये पेक्षा अधिक रकमेच्या 7 कामाची ऑन लाइन टेंडर अश्या
105 कामाच्या निविदांवर 5 कोटी 26 लाख 39 हजार 563 रुपये खर्च केले जाणार असल्याची
माहिती सूत्रांनी दिली.