ठाणे : शिवसेनेचे दिवंगत जिल्हाप्रमुख आनंद दिघे यांच्या जीवनावर आधारित असलेला धर्मवीर -2 चित्रपटावरून आता ठाण्याचे राजकारण चांगलेच तापले आहे. धर्मवीर-2 च्या टिझर वर आक्षेप नोंदवल्यानंतर आता चित्रपट चुकीचा प्रदर्शित केला तर शिवसैनिक आता रस्त्यावर उतरतील असे सांगत कोर्टात जाण्याचा इशारा देखील उबाठा पक्षाचे जिल्हाप्रमुख केदार दिघे यांनी दिला आहे.
धर्मवीर चित्रपटाच्या टिझरचे नुकतेच उद्घाटन करण्यात आले. मात्र चित्रपट प्रदर्शित होण्याच्या आधीच यावरून चांगलेच राजकारण तापले आहे. उबाठा पक्षाचे जिल्हाप्रमुख केदार दिघे यांनी चित्रपटावर बरेच आक्षेप नोंदवले आहे. आनंद दिघे यांच्याबद्दल कोण असे वाईट बोलत असेल तर सहन केले जाणार नाही. धर्मवीर 1 हा फेक होता सर्वांना माहीत आहे. शिंदे हे दिघे यांना खांद्यावर घेऊन जाताना भंपकपणा होता. स्वतःची स्टोरी लाईन साठी चित्रपट केला. आपण केलेली पाप कसे लपवायचे हेच यातून स्पष्ट होते. चित्रपटाचे दिग्दर्शक यांना आवाहन आहे कि चांगले सिन दाखवा दिघे साहेबांनी जे केले ते दाखवा, टिझरवर आम्ही आक्षेप नोंदवला आहेच. शिंदे यांनी स्वतःवर चित्रपट तयार करावा, खोटे का दाखवत आहेत असा प्रश्न दिघे यांनी उपस्थित केला आहे.
आनंद दिघे यांच्या मृत्यूबाबत तुम्ही 22 वर्ष का गप्प बसला आहात. चित्रपट खोटं प्रदर्शित केले तर एकदिवस ठाणेकर रस्त्यावर उतरतील. सर्व ठाणेकर आणि शिवसैनिकांना आवाहन करण्यात येत आहे कि भूलथापांना बळी पडू नका. चित्रपटात काही चुकीचे असेल तर आम्ही नक्की कोर्टात जाऊ. असा इशारा केदार दिघे यांनी दिला आहे.
हा धर्मवीर 2 च्या चित्रपट निर्मात्यांनी जो संवाद दिघे साहेबांच्या तोंडी घातला आहे, तो एकनाथ शिंदे यांची प्रतिमा मोठी करण्यासाठी दिघे साहेबांना छोटं दाखवण्यासाठी घेण्यात आला आहे का?
आनंद दिघे शिंदे यांच्या हिंदुत्वाच्या आड कशासाठी येतील? म्हणजे चित्रपट काढणार्यांना आनंद दिघे यांच्या हिंदुत्वावर विश्वास नाही का?
आनंद दिघे हिंदुत्वाच्या आड येऊ शकतात असं चित्रपट निर्माते आणि शिंदे यांना म्हणायचं आहे का?
2000 साली बाळासाहेब हयात असताना शिंदेंना आनंद दिघे असं का सांगतील? आणि जर असं आनंद दिघेंनी शिंदेंना त्यावेळी सांगितलं असेल तर बाळासाहेबांनी 2009 साली काँग्रेसच्या प्रतिभाताई पाटील यांना राष्ट्रपती पदासाठी पाठिंबा दिला होता त्यावेळी एकनाथ शिंदे कुठे होते?
मुळात आपल्या पक्षाच्या भूमिका घेण्याचा सर्वाधिकार हा शिवसेना पक्ष नेतृत्वाला असतो हेच मान्य करायला शिंदे तयार नाहीत. पक्ष नेतृत्वाने घेतलेले निर्णय हे अंतिम असतात ते पक्षाच्या हिताचे असतात हे शिंदेंना मान्य नाही. स्वतःला पक्षापेक्षा, बाळासाहेब ठाकरे, दिघेसाहेब, मातोश्री, उद्धव साहेब ठाकरे यांच्या पेक्षा मोठे समजायला लागल्यानेच शिंदेंच्या डोक्यात अशा पद्धतीची हवा गेली आहे... आपण केलेली वाईट कृत्ये लपवण्यासाठी चित्रपट काढून प्रतिमा सुधारण्याचा हा प्रयत्न आहे.