

धनराज गोपाळ
पोलादपूर शहर: पोलादपूर तालुक्यातील सावित्री-कामथे नदीपात्रात सुरू असलेल्या बेकायदेशीर वाळू उपशामुळे पर्यावरणाला गंभीर धोका निर्माण झाला असून शासनाच्या नियमांची सर्रास पायमल्ली होत असल्याचा आरोप "आपली माती आपली माणसं" संघटनेचे संस्थापक राज पार्टे व अध्यक्ष निलेश कोळसकर तसेच ग्रामीण कमिटीचे अध्यक्ष हरिभाऊ पवार यांनी केला आहे.
संघटनेच्या वतीने वेळोवेळी पुराव्यानिशी संबंधित प्रशासनाकडे तक्रारी व पत्रव्यवहार करण्यात आले. मात्र, शासनाच्या स्तरावर केवळ कागदोपत्री कारवाई होत असल्याचे दिसून येत असल्याने नागरिकांमध्ये नाराजीचा सूर उमटत शेत जमीन हि मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. असुन महसूल विभाग नेमके काय करत आहे? कोणाच्या दबावाखाली कारवाईस विलंब लावला जात आहे का? असा सवालही राज पार्टे यांनी उपस्थित केला आहे.
दरम्यान, या संदर्भात तहसीलदार कपिल घोरपडे यांच्याशी दूरध्वनीवर संपर्क साधला असता, त्यांनी बेकायदेशीर वाळू उपसा करणाऱ्यांवर कारवाई करण्यात आल्याची माहिती दिली. संबंधित प्रकरणात महसूल विभागाकडून पंचनामा करण्यात आला असून पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे. तसेच दोषींवर दंडात्मक कारवाईदेखील करण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
मात्र, ही कारवाई केवळ औपचारिक स्वरूपाची राहणार की वाळू माफियांविरोधात कठोर आणि प्रभावी पावले उचलली जाणार, याकडे आता नागरिकांचे लक्ष लागून राहिले आहे. पर्यावरणाची हानी थांबविण्यासाठी आणि नदीपात्रांचे संरक्षण करण्यासाठी प्रशासनाने ठोस भूमिका घेण्याची मागणी स्थानिक नागरिकांकडून होत आहे.