भाईंदर : आगामी विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम लवकरच जाहीर होणार असला तरी तो दसर्यापर्यंत तरी जाहीर होणार नसल्याचे हेरून मिरा-भाईंदर शहरात राजकीय मंडळींकडून विविध ठिकाणी गरब्याचे आयोजन करण्यात आले आहे. यामुळे गरबा प्रेमींना या राजकीय गरब्यात सहभागी होण्यासह त्यातील बक्षिसे जिंकण्याची संधी उपलब्ध करुन दिली जात आहे. गरबा प्रेमींसाठी आपल्यातील गरबा कलेला सादर करण्याची चांगली संधी उपलब्ध होत आहे.
आगामी विधानसभा निवडणूक मिरा-भाईंदरमध्ये राजकीय चढाओढीची ठरणार आहे. कारण भाजप या एकाच पक्षातून विद्यमान आ. गिता जैन, माजी आ. नरेंद्र मेहता व माजी जिल्हाध्यक्ष ऍड. रवी व्यास हे मिरा-भाईंदर मतदार संघातून निवडणूक लढविण्यास इच्छुक आहेत. त्यासाठी त्यांनी पक्षश्रेष्ठींकडे फिल्डिंग लावली असली तरी जैन यांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्या गटातूनही निवडणूक लढण्याची तयारी करून ठेवल्याचे बोलले जात आहे. मात्र या तिघांपैकी एकालाच निवडणूक लढविण्याची संधी मिळणार असल्याचे बोलले जात असले तरी पक्षाकडून या इच्छुकांना दणका देण्यासाठी शहराबाहेरील उमेदवार देण्यात येणार असल्याची कुजबूज देखील सुरु झाली आहे. या जर तर च्या राजकारणाकडे दुर्लक्ष करून या तिघांनी आपापला जनसंपर्क वाढविण्यास सुरुवात केली आहे. मेहता यांनी तर घटस्थापनेच्या दिवशी शहरात असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करून आपल्या जनसंपर्क अभियानाला सुरुवात केली आहे.