

श्रद्धा शेवाळे
ठाणे : बाप्पांच्या आगमनाची चाहूल लागताच सजावटीच्या बाजारात चैतन्य आले आहे. मात्र, या चैतन्यावर प्लास्टिकच्या कृत्रिम फुलांनी नैसर्गिक सौंदर्याला आणि नैसर्गिक सुगंधाला ग्रहण लावले आहे. राज्य सरकारने प्लास्टिक फुलांवर बंदीची घोषणा करूनही बाजारपेठा आजही याच फुलांनी ओसंडून वाहत आहेत.
फलोत्पादन मंत्री भरत गोगावले यांनी विधानसभेत कृत्रिम फुलांवर बंदी घालण्याची घोषणा केली. मात्र ही घोषणा होऊनही बाजारातील चित्र बदललेले नाही. गणेशोत्सवाच्या तोंडावर विक्रेते मोठ्या प्रमाणात प्लास्टिक फुलांची विक्री करत आहेत, तर ग्राहकही त्याकडेच आकर्षित होत आहेत. नाशिक, पुणे, सातारा आणि सांगलीसारख्या जिल्ह्यांतील हजारो शेतकरी हरितगृहांमध्ये वर्षभर मेहनत घेऊन फुले पिकवतात. मात्र, बाजारात खर्या फुलांना मागणीच उरली नसल्याने त्यांची अवस्था बिकट झाली आहे. कर्ज काढून सुरू केलेली फूलशेती आता तोट्यात गेल्याने अनेक शेतकर्यांनी इतर पिकांकडे वळण्यास सुरुवात केली आहे.
* स्थानिक फूलशेती आणि पारंपरिक व्यवसाय पूर्णपणे कोलमडला आहे.
* शेतकर्यांना मोठा आर्थिक फटका बसत असून ते कर्जबाजारी होत आहेत.
* फुलांवर अवलंबून असलेले मध उत्पादन आणि मधमाश्यांची संख्या घटली आहे.
* नैसर्गिक जैविक चक्रावर (इकॉलॉजिकल सायकल) गंभीर परिणाम होत आहे.
* वापरानंतर ही फुले कचर्यात जातात त्यामुळे जमिनीचे आणि पाण्याचे प्रदूषण वाढते.
स्थानिक आणि ताजी फुले : सजावटीसाठी स्थानिक शेतकर्यांकडून ताजी फुले खरेदी करा.
नैसर्गिक वाळलेली फुले : वाळलेली फुले आणि पाने सजावटीसाठी एक सुंदर पर्याय आहे.
कागदी आणि कापडी फुले : हाताने बनवलेली कागदी किंवा कापडी फुले वापरा.
धान्य, पानांची आरास : आंब्याची पाने, नारळाच्या झावळ्या व विविध धान्यांचा वापर करून आकर्षक आरास करता येते.