Peacock News | कल्याण जवळच्या गांधरे-आंबिवली-वडवली पट्ट्यात मोरांचे दर्शन

सकाळच्या सुमारास वनराईत सहा मोरांचा थवा; मॉर्निंग वॉकर्सचे मन सुखावले
कल्याण, ठाणे
कल्याण जवळच्या गांधारे परिसरातील जंगलात सकाळच्या सुमारास मोरांचा थवा दृष्टिक्षेपात येतो आहे.(छाया : बजरंग वाळुंज)
Published on
Updated on

डोंबिवली : गेल्या काही दिवसांपासून सकाळच्या सुमारास कल्याण पश्चिमेकडील गांधारी उड्डाण पूल ते वडवली-आंबिवली भागातील वनराई परिसरात सकाळच्या वेळेत फिरण्यास गेलेल्या नागरिकांना मोरांचे दर्शन होत आहे.

Summary

सहा मोरांचा थवा या भागातील वनराईत सकाळपासून झाडा-झुडपांमधून मोकळ्या माळरानावर फिरत असतो. सकाळी सहा वाजल्यापासून फिरण्यासाठी बाहेर पडलेल्या नागरिकांना या मोरांचे दर्शन होत आहे. अशा मनमोहक दृशांमुळे मॉर्निंग वॉक करणाऱ्यांचे मन सुखावून जाते.

सकाळच्या प्रसन्न वातावरणात मोरांचे दर्शन होत असल्याने या भागात फिरावयास जाणाऱ्या नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. कल्याण शहरातील अनेक नागरिक पहाटेपासून गांधारे उड्डाण पूल भागातील टिटवाळा ते कल्याण बाह्यवळण मार्गावर जातात. गांधारी उड्डाण पूलाच्या परीसरात आपली दुचाकी आणि चारचाकी वाहने उभी करून अनेकजण तेथून गांधारे, आंबिवली, वडवली, अटाळीच्या दिशेने पायी टिटवाळ्याकडे जातात. यामध्ये शहरातील डाॅक्टर, वकील, कार्पाेरट, प्राध्यापक, तरूण आणि तरूणींचा सहभाग असतो. अनेक कुटुंबे देखील सकाळच्या वेळेत या भागात फिरण्यासाठी जातात.

गांधारे पुलाकडून आंबिवली-वडवली दिशेने बाह्य वळण रस्त्याने पायी जात असताना रस्त्याच्या दुतर्फा ताड, माड, आंबे, मोह, जंगली झाडे-झुडपांचे जंगल आहे. या गर्द झाडीत विविध प्रकारचे पक्षी अधिवास करून आहेत. सकाळच्या सुमारास पक्ष्यांचा चिवचिवाट, कलकलाट सुरू असतो. झाडा-झुडपांतून मोकळ्या माळरानावर सहा मोरांचा थवा देखिल विहार करत असतो. नागरिकांना पाहिल्यानंतर मोर जागीच थुईथुई नाचून पसारा फुलवून जणू सलामी देतात. मोर आणि त्यांचा फुलणारा पिसारा यांची मोबाईलमधून छायाचित्रे काढण्यासाठी नागरिकांची चढाओढ असते. आपणास पाहून वा हरकतींमुळे पळून जाऊ नये म्हणून शांतपणे नागरिक मोरांना आपल्यापासून कोणताही धोका उद्भवणार नाही याची काळजी घेतात. कल्याण शहरा जवळच्या जंगलात मोरांचा अधिवास आहे आणि त्यांचे दररोज आपणास दर्शन होत असल्याने सकाळच्या सुमारास या भागात फिरण्यासाठी येणारे नागरिक समाधान व्यक्त करत आहेत.

ओल्या पार्ट्यांसह प्रदूषणाचा प्राणी व पक्षांना होतोय त्रास

रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या मोकळ्या जागांवर दारूच्या बाटल्या, प्लास्टिकच्या पिशव्या, फटाक्यांचा कचरा इतस्ततः विखुरलेला असतो. त्यामुळे रात्रीच्या सुमारास या भागात काही जण येऊन ओल्या पार्ट्या झोडत असल्याचे पडलेल्या कचऱ्यावरून स्पष्ट होते. प्राणी आणि पक्षांचा अधिवास असल्याने त्यांना कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही यासाठी रात्रीच्या सुमारास कुणीही धिंगाणा घालणार नाही याची काळजी पोलिस आणि वन विभागाने घेण्याची मागणी नागरिकांसह निसर्गप्रेमींकडून करण्यात येत आहे. या भागात रात्री उशिरा पोलिसांची गस्ती वाहने फिरत असतात. मात्र तरीही ओल्या पार्ट्या बंद होत नसल्याने स्थानिक रहिवाशांकडून आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.

जीवसृष्टीसह जैवविविधतेचे संवर्धन आवश्यक

कल्याणमधील गांधारे पुलाकडून वळण रस्त्याने वडवली-आंबिवली दिशेला आपण दररोज सकाळी फिरण्यासाठी जातो. या कालावधीत आपणास दिवसाआड या भागात सकाळच्या वेळेत मोरांचा थवा दिसतो. या कालावधीत मोर थुईथुई करून पिसारा फुलवतो. हे विहंगम दृश्य पाहताना प्रसन्न वाटते. कल्याण शहराजवळच्या जंगलात मोरांसह विविध प्रकारची जैवविविधता आहे त्यांचे संवर्धन होणे आवश्यक असल्याचे मत कल्याणकर रहिवासी अजय क्षीरसागर यांनी व्यक्त केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news