

नीती मेहेंदळे
लेण्यांव्यतिरिक्त गावात आणि परिसरात फेरफटका मारला, तर पुढची काही शतकं गावात होत गेलेले बदल आपोआप समजत जातात. चौकातलं विठ्ठल मंदिर असंच एक प्राचीन खुणा जपताना दिसतं. मंदिर आता जीर्णोद्धारीत असलं तरी त्याजवळ असलेली चौकोनी दगडी बारव आणि तिचं अप्रतिम बांधकाम आपल्याला त्याच्या प्राचीनत्वाची दखल घ्यायला लावतं.
कुणी पाराशर नगर म्हणतात, कुणी नानासाहेबांचं पातूर, कुणी शाहबाबूंचं पातूर, तर कुणी अजून काही. तर, विदर्भात अकोला जिल्ह्यात पातूर नावाचं एक शहर आहे. तीन बाजूंनी डोंगर असल्याने गावाला नैसर्गिक संरक्षक कवचकुंडलं लाभली आहेत. इथल्या एका डोंगरातून एक नदी उगम पावते, ती म्हणजे सुवर्णा नदी. ही नदी या गावासाठी जीवनवाहिनीच, त्यामुळे पाण्याची तशी ददात नसलेलं हे गाव. शिवाय पातूरच्या पूर्वेलाही डोंगर आहेत. जिथून मोरना नदी खळाळते आहे आणि तिथे पातूरचं मोठं धरणही आहे. गावाचे, मुख्य गाव, बागायत पातूर आणि जिरायत पातूर असेही भाग पडले आहेत. या बागायत पातूरमध्ये एक टेकडीवर पातूरची प्राचीन लेणी तर दुसऱ्यावर रेणुका देवीचं मंदिर आहे. गावाने खूप मोठा कालखंड पाहिलेला आहे, हे तिथल्या लेण्यांवरून पहिलं ध्यानात येतं.
ही ऐतिहासिक लेणी वाशिमचे वाकाटक वंशाच्या वत्सगुल्म शाखेचा सम्राट हरिषेण आणि त्याचा मुख्यमंत्री वराहदेव यांनी संयुक्तपणे बनवलेल्या अनेक स्थळांपैकी एक आहेत असे मानतात. ही लेणी म्हणजे एका अखंड बसाल्ट खडकात खोदून काढलेल्या 3 सलग बांधीव गुंफा आहेत. प्राथमिक गुंफा समोरच्या बाजूला आहे आणि इतर 2 मुख्य गुंफेच्या दोन्ही बाजूंना आहेत. या गुंफांची निर्मिती सातवाहन राजवंशापासून म्हणजे इ.स.पूर्व दुसरं शतक ते इ.स. तिसऱ्या शतकापर्यंत झाली असावी. वाकाटक राजा हरिषेण (कारकीर्द इ.स. 480 ते 510) आणि त्याचा मंत्री वराहदेव यांनी 400 वर्षं चाललेलं हे खोदकाम पूर्ण केले.
प्रथम 1730 मध्ये ब्रिटिश पुरातत्व शास्त्रज्ञ एडमंड लायन व आर्मी ऑफिसर रॉबर्ट गिल यांनी ही गुहा शोधली. अजिंठाची फ्रेस्को भित्तिचित्रं शोधणारा तोच रॉबर्ट गिल. इ.स. 1923 मध्ये वाय. एम. काळे यांनी शोधलेला संस्कृतमध्ये एक शिलालेखानंतर काळाच्या ओघात नष्ट झाला, हे दुर्दैव. लेण्यांमध्ये 2 फरसबंद सभामंडप आहेत, एक दुसऱ्यामागे आहे. त्यांच्या मागील गर्भगृहात पायऱ्या आहेत. दोन्ही गर्भगृहे या सभामंडपांपेक्षा उंच आहेत. आपण मुख्य गुंफेत प्रवेश करताच, 2 चौकोनी स्तंभ व 2 अर्धस्तंभांनी बनलेले पहिले प्रवेशद्वार लागते. हा मंडप 9 फूट खोल आहे, जो पुन्हा 1 पायरी उंच असलेल्या अंतरमंडपाकडे जातो.
हा आतला मंडप साधारण 4 मीटर खोल आहे आणि 2 स्तंभ आणि 2 अर्धस्तंभांनी आधारलेला आहे. गर्भगृह चौकोनी आहे, जे मागील भिंतीजवळ काहीसे उंच उठावलेले आहे. बहुतेक त्यावर शिवलिंग आहे. येथे पार्वतीची फक्त 1 मूर्ती सापडली होती. आता ही मूर्ती नागपूरच्या मध्यवर्ती संग्रहालयात ठेवण्यात आली आहे.
या मूर्तीचा काळ इ.स. 450 असावा. गर्भगृहाच्या बाहेर पेटिकाशीर्षावर ब्राह्मी लिपीत एक वाकाटक काळातील शिलालेख सापडला होता, अशी अकोला गॅझेटमध्ये नोंद आहे. सातवाहन व वाकाटक राजवंशांच्या काळात एकाश्म खडकातून लेणी खोदण्याच्या सुरुवातीच्या टप्प्यात हे ठिकाण होते, हे यावरून सिद्ध होते.
ही लेणी अजिंठाच्या मुख्य टप्प्यातील लेण्यांच्या महत्त्वाच्या पूर्वसूचक मानली गेली आहेत. तथापि, तिथल्या स्थानिक भूगर्भीय वैशिष्ट्यांमुळे किंवा त्रुटींमुळे निर्माण झालेल्या निर्बंधांमुळे कोरीवकामासाठी हे खडक अयशस्वी ठरले. पण, या लेण्यांमुळे लोणावळ्याजवळच्या भाजे गावाप्रमाणे पातूर एकदम प्राचीन कालखंड जगलेलं शहर आहे हे सिद्ध होतं.
लेण्यांव्यतिरिक्त गावात आणि परिसरात फेरफटका मारला, तर पुढची काही शतकं गावात होत गेलेले बदल आपोआप समजत जातात. चौकातलं विठ्ठल मंदिर असंच एक प्राचीन खुणा जपताना दिसतं. रेणुका माता मंदिर वायव्येकडील एका दुसऱ्या टेकडीवर स्थित असून ते 16व्या शतकात बांधले गेले असे मानले जाते. बागायत पातूर मधलं अजून एक महत्त्वाचं ठिकाण म्हणजे नानासाहेब वाडा. हे नानासाहेब पेशवे नसून पातूरमध्ये वास्तव्य असलेले नारायण आमले नामक जमीनदार होते.
नानासाहेब आणि मुघल यांच्यातील संघर्षानंतर, मुघल त्यांच्यासोबत खूप मौल्यवान खजिना आणि सोन्याची नाणी इथून घेऊन गेले. ते निघून गेल्यावर नानासाहेबांनी नदीतून चोर मार्ग काढला. म्हणूनच आज या नदीला सुवर्णा नदी म्हणतात. त्यांच्या वाड्यात एक गुप्त भुयार आहे आणि त्यात ते सोनंनाणं आहे, अशी एक आख्यायिका गावात सांगतात. मुघल काळ गावाने निश्चित पाहिला आहे. “बाळापूर वेस.” गावाच्या पश्चिमेला, बाळापूरकडे जाणाऱ्या रस्त्याच्या उजवीकडे नानासाहेबांचा मोठा वाडा आहे. हा वाडा 17 व्या शतकातील असावा, असं त्याच्या बांधकामावरून सांगता येतं. वाडा चौसोपी असून त्याच्या चारही बाजूंना भक्कम बुरुज व तटबंदी आहे. वाडा पक्क्या विटा व चुन्याच्या बांधकामाचा आहे.
आत शिरताचक्षणी दोन बाजूंना पहारेकऱ्यांच्या देवड्या आहेत. सभागृहाच्या बाहेरील भिंती शिल्पांनी सजवलेल्या आहेत, ज्याची रचना वैशिष्ट्यपूर्ण आहे. सभागृहात एक मंदिर असून या मंदिरात नानासाहेब आणि त्यांच्या पत्नीच्या समाधी आहेत. समाधीसमोर एक कासवाचं शिल्प आहे. मंदिरामागे नानासाहेबांचे शिष्य सोनाजी आणि होनाजी यांच्या समाधी आहेत. वर हत्तीचे शिल्प आहे. वाड्याची वैशिष्ट्यं म्हणजे एक लांबलचक भुयार, एक दोन दीपमाळांवर बांधलेली तिसरी दीपमाळ व एक खोल विहीर. वाड्यातील दीपमाळ अंदाजे 14-15 फूट लांब आहे. त्या काळात रात्रीच्या वेळी परिसर प्रकाशित करण्यास या दीपमाळेचा वापर केला जात असे. दीपमाळेच्या खोबणीत एका वेळेस 150-200 दिवे लावले जात असत.
मंदिराला वेढलेल्या कमानीत हनुमानाची मूर्ती आहे. वाडा पूर्वाभिमुख असून या प्रवेशद्वाराला दिंडी दरवाजा आहे. या प्रवेशद्वारावर नगरखाना आहे. तटबंदीवर जाण्यास चार मार्ग आहेत. प्राचीन काळात येथे सुमारे दीड महिने यात्रा भरत असे. तथापि, 1842 मध्ये लागलेल्या आगीमुळे ही यात्रा थांबली. या वाड्यात, तीर्थयात्रेच्या काळात धान्य दळण्यास वापरले जाणारे एक प्रचंड मोठं दगडी जातं आहे. ते इतकं मोठं आहे की, कोणीही एकटे धान्य दळू शकत नाही; तो फिरवायला पाच ते सहा माणसं लागतात. या वाड्याचे एक रहस्य म्हणजे आत असलेली खोल विहीर. असे म्हटले जाते की, या विहिरीचे पाणी 12 महिने आटत नाही.
पातूरच्या पश्चिमेकडे शाहबाबू दर्ग्याचे ऐतिहासिक महत्त्व आहे. शाहबाबूचा जन्म मक्का येथे झाला. अजमेर शरीफ बुलंद दरवाजाची प्रतिकृती असलेला बुलंद दरवाजा 1950 मध्ये हाजी सय्यद अकबर यांनी बांधला. पातूरसारखी लहान सहान शहरंही खूप काही दस्तावेज उराशी बाळगून असतात. तो उलगडायला हवा, त्यातूनच तर आपल्या महाराष्ट्राचं महत्व आपल्याला समजायला मदत होईल.