Palghar News : मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील अपघात रोखण्यासाठी उपाययोजना; एसपी अॅक्शन मोडवर

Palghar News : मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील अपघात रोखण्यासाठी उपाययोजना; एसपी अॅक्शन मोडवर


पालघर: मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४८ वरील होणाऱ्या गंभीर व प्राणांतिक अपघातांना आळा घालण्यासाठी जिल्ह्यातील पोलीस यंत्रणा आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यांच्या संयुक्त विद्यमाने अपघाताची कारणे व उपाययोजना यासंदर्भात चर्चा करण्यात आली. महामार्गावरील वाढत्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर जिल्हा पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील आता अॅक्शन मोडवर आले आहेत. त्यांनी एक बैठक आयोजित करून संबंधितांना महत्त्वाच्या सुचना दिल्या. (Palghar News)

राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणचे प्रकल्प संचालक सुहास चिटणीस, प्रबंधक सुमीत कुमार, रोड कॉन्ट्रॅक्टर, रोड सेफ्टी ऑडीटर, रोड स्ट्रक्चर तसेच महामार्गावर असलेले तलासरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विजय मुदडक, कासा प्रभारी अधिकारी नामदेव बंडगर, मनोरचे सतिश शिवरकर, जिल्हा वाहतूक शाखा प्रभारी असिफ बेग, महामार्ग सुरक्षा पोलीस पथक, मनोर पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र ठाकूर, महामार्ग सुरक्षा पोलीस पथक, चारोटी पोलीस उपनिरीक्षक इर्शाद सय्यद यावेळी उपस्थित होते. (Palghar News)

यावेळी पालघर जिल्ह्यातील मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील अपघाताच्या संदर्भात अपघाताची कारणे व उपाययोजना यासंदर्भात सखोल चर्चा करण्यात आली. तसेच राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनाही पोलीस अधीक्षक पाटील यांनी सूचना केल्या आहेत.

Palghar News : अपघाताची कारणे व उपाययोजना

1. राष्ट्रीय महामार्ग ४८ वर सर्व ठिकाणी दिशादर्शक-वेगमर्यादा फलक, अपघात प्रवण क्षेत्र फलक तत्काळ लावणे.

2. खानीवडे टोलनाका ते आच्छाड चेकपोस्ट दरम्यान रस्त्यावर पडलेले खड्डे तत्काळ बुजवणे. जेणेकरून अपघाताचे प्रमाण कमी होईल.

3. खानीवडे टोलनाका ते आच्छाड चेकपोस्ट दरम्यान असलेल्या ब्रिजवर प्रकाश योजना, रॅम्बलर स्ट्रिप्स, दिशादर्शक आणि वेगमर्यादा फलक यांची उपाययोजना तत्काळ करणे.

4. रस्त्याच्या दुभाजकांची उंची वाढवणे. जेणेकरून एका वाहिनीवरील वाहन दुसऱ्या वाहिनीवर जाऊन गंभीर स्वरूपाचे अपघात होऊ नये.

5. राष्ट्रीय महामार्गावर बंद पडलेल्या लाईटची दुरुस्ती करून तत्काळ त्या सुरू करण्यात याव्यात.

6. राष्ट्रीय महामार्गावर अत्याधुनिक अशा क्रेन, अम्ब्युलन्स, हायवे पेट्रालींग व्हेइकल तत्काळ तैनात करण्यात याव्यात.

7. राष्ट्रीय महामार्गावर ज्या ठिकाणी अनावश्यक रोड कट आहेत ते तत्काळ बंद करून त्या ठिकाणी सुरक्षा रक्षक जाळी बसविणे.

8. महामार्गावर ज्या ठिकाणी कट आहेत त्या ठिकाणी स्टोरेज लाईन करणे.

9. राष्ट्रीय महामार्गावर भरधाव वेगाने वाहने चालविल्यामुळे गंभीर अपघात होतात. त्यात अनेकांचा मृत्यू झाला आहे.

10. महामार्गावर अत्याधुनिक आणि उच्चप्रतीचे सीसीटीव्ही कॅमेरे बसविणे. अपघात प्रवण क्षेत्रावर रॅम्बलर स्ट्रिप्स, कॅटआईज, ब्लकर लाईट महामार्गावर तत्काळ बसविणे.

जव्हार फाटा, मनोर या ठिकाणी वारंवार गंभीर स्वरूपाचे अपघात होऊन जीवितहानी होत असते. अशा ठिकाणी तत्काळ सर्विस रोड तयार करून जव्हार फाटा क्रॉसिंग कट तत्काळ बंद करण्याच्या सक्त सूचनाही यावेळी देण्यात आल्या.

पालघर जिल्ह्यात राष्ट्रीय महामार्ग ४८ हा एकूण ८६ कि. मी. लांबीचा आहे. या मार्गावरील अपघात कमी करून जीवितहानी कमी करण्याच्या अनुषंगाने सखोल चर्चा करून त्याची अंमलबजावणी तत्काळ करण्याच्या सूचना दिल्या. तसेच क्रेन, अॅम्ब्युलन्स, पेट्रोलींग वाहन, रस्त्यावर पडलेले खड्डे व त्यामुळे होणारी वाहतूक कोंडी व गंभीर स्वरुपाचे होणारे अपघात यांचे प्रमाण कमी करावे, या दृष्टीने ही बैठक होती.

– बाळासाहेब पाटील, पोलीस अधीक्षक, पालघर

हेही वाचा 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news