

ठाणे : शुभम साळुंके
कल्याण शीळ रस्त्यावरील दुसऱ्या वाकड्या पलावा उड्डाणपुलाच्या कामाला सुरुवात करण्यात आली आहे. शनिवार (दि.15 ) पासून वाहतूक रविवार ( दि.30) पर्यंत गर्डर लॉन्चिंगचे काम सुरु असणार आहे. ठाणे शहर वाहतूक शाखेचे उपायुक्त पंकज शिरसाट यांनी याबाबतचे वाहतूक बदलाचे प्रसिद्धीपत्रक जारी केला आहे. एमएमआरडीए कडून हे काम हाती घेण्यात आलं असून त्यासाठी आवश्यक असणारी तयारी पूर्ण करण्यास सुरुवात करण्यात आली आहे.
कल्याण शीळ रस्त्यावरील वाहतूक कोंडीस कारणीभूत ठरत असलेले उड्डाणपुलांचे काम निवडणुकीच्या आधी पुन्हा वेगानं सुरु झालं आहे. सातत्याने अनधिकृत बांधकामांनी चर्चेत असलेला दुसरा उड्डाणपूल वेगानं पूर्णत्वाकडे येत आहे. यासाठी ठाणे शहर वाहतूक शाखेच्या उपायुक्तांनी परिपत्रक जारी केलं आहे. त्यांनी म्हटलं आहे कि, कोळसेवाडी वाहतूक विभागाच्या हद्दीतील एमएमआरडीए कडून लोढा पलावा जंक्शन येथे काटई ते देसाई खाडी पर्यंत कल्याण कडून शिळफाट्याकडे जाणाऱ्या वाहिनीवर नवीन ब्रिजचे काम सुरु आहे. त्याकरिता कासारिओ कट येथे ३ सिमेंट गर्डर व देसाई खाडीवर १२ सिमेंट गर्डर मोठ्या क्रेनच्या सहाय्याने ठेवण्यात येणार आहेत. सदर काम १५ नोव्हेंबर पासून ३० नोव्हेंबर पर्यंत सुरु राहणार आहे. त्यामुळे या कालखंडात वाहतूक कोंडीची समस्या उद्भवू नये यासाठी वाहतूक विभागाने परिपत्रक जारी केलं आहे.
वाहतूक कोंडीत नवीन बदल !
प्रवेश बंद १ : कल्याण कडून मुंब्रा,कल्याण फाट्याकडे जाणाऱ्या सर्व प्रकारच्या हलक्या वाहनांना लोढा पलावा जंक्शन महालक्ष्मी हॉटेल समोरील चौक येथे प्रवेश बंद करण्यात आला आहे.
पर्यायी मार्ग : सदरची वाहन कल्याण फाट्याकडून येणाऱ्या वाहिनीवर उजवीकडे वळण घेऊन पुढे विरुद्ध दिशेने सरस्वती टेक्स्टाईल्स समोरील गॅप पर्यंत जाऊन त्यानंतर डावीकडे वळण घेऊन इच्छित स्थळी जातील.
प्रवेश बंद २ : कल्याण कडून मुंब्रा कल्याण फाट्याकडे जाणाऱ्या सर्व प्रकारच्या जड वाहनांना काटई चौक (बदलापूर चौक) येथे प्रवेश बंद करण्यात आला आहे.
पर्यायी मार्ग : सदरची वाहने काटई चौक (बदलापूर चौक ) - खोणी नाका- तळोजा एमआयडीसी मार्गे इच्छित स्थळी जातील असं वाहतूक विभागानं सांगितले आहे.