Pahalgam Firing | बाबा निस्तेज होऊन पडले... उठलेच नाहीत

Thane News । दिवंगत अतुल मोने यांची कन्या ऋचाने सांगितला थरारक घटनेचा प्रसंग
डोंबिवली , ठाणे
दिवंगत अतुल मोने यांची कन्या ऋचाने काळजाचा थरकाप उडवणारा अनुभव कथन केला.Pudhari News Network
Published on
Updated on

डोंबिवली : पहलगामच्या मिनी स्वीत्झर्लंड अर्थात बैसरनमधील टेकड्यांच्या पठारावर काही अंतरावर समोर दोन जण गोळीबार करत असल्याचे दिसत होते. आमच्यापर्यंत ते पोहोचतील आणि भयानक काही तरी होईल असे वाटलेही नव्हते. अचानक दोन दहशतवादी आमच्या समोर आले. त्यांनी आधी संजयकाका, हेमंत काका आणि त्यानंतर माझ्या बाबांना (अतुल मोने) गोळ्या घातल्या. माझी आई आणि माझ्या समोरच बाबांना गोळी घातल्याने आम्ही हादरलो. बाबा जमिनीवर कोसळले. त्यांना उठविण्याचा आम्ही प्रयत्न करत होतो. मात्र बाबा निस्तेज होऊन पडले होते ते उठलेच नाहीत, असा काळीज पिळवटून टाकणारा पहलगाम हल्ल्याचा थरारक अनुभव सांगताना अतुल मोने यांची १६ वर्षीय कन्या ऋचाला अश्रू अनावर झाले होते.

विस्तीर्ण पठारावर समोरच घनदाट जंगल, त्या जंगलातून दहशतवादी आले. काही कळण्याच्या आत संजयकाका (लेले), हेमंतकाका (जोशी) यांच्यावर दहशतवाद्यांनी गोळ्या झाडल्या. त्यानंतर त्यांनी आमच्याकडे नजर फिरवली. माझे बाबा (अतुल मोने) त्या दोघा दहशतवाद्यांना ‘आम्हाला गोळ्या मारू नका, आम्ही काहीही करत नाही, आम्हाला सोडा’, अशी विनवणी करत होते. बाबा बोलत असताना आमच्या समोरच बाबांच्या दिशेने दहशतवाद्यांनी गोळी झाडली. बाबा जमिनीवर निपचित पडले. एकमेकींना सावरत आई आणि मी २० मिनिटे त्यांना उठविण्याचा प्रयत्न केला. मात्र ते उठू शकत नव्हते. बाबा जमिनीवर निपचित पडले असताना आम्ही त्यांना उठवून सुरक्षित ठिकाणी नेण्याचा प्रयत्न करत होतो. दहशतवादी इतर पर्यटकांवर गोळीबार करत होते. बाबा जमिनीवर पडले आहेत आता आपले काय होणार या तणावपूर्ण वातावरणात असताना पर्यटकांना मारल्यानंतर दोन्ही दहशतवादी तेथून पळून गेले.

बाबांना सोडून निघताना पाय उचलत नव्हते

तुम्ही येथे थांंबु नका, पहलगामच्या दिशेने निघुन जा, लष्कराची वाहने येतील, ते गोळीबारात मरण पावलेले पर्यटक घेऊन जातील, असा स्थानिक सल्ला देत होते. स्थानिकांच्या सूचनेप्रमाणे आम्ही बाबांना आहे त्या परिस्थितीत तेथेच सोडून तेथून निघालो. पण बाबांना सोडून तेथून निघताना पाय उचलत नव्हते. कोणत्याही मदतीची शक्यता नव्हती. सगळे काही अनपेक्षित घडले होते, असे ऋचाने साश्रुनयनांनी सांगितले.

सरकारकडून न्याय मिळायला हवा

जम्मू-काश्मीर पर्यटनातील पहलगामच्या बैसरन येथील आमचा पर्यटनाचा पहिलाच दिवस होता. असे काही घडेल असे मनातही नव्हते. काश्मीर सुरक्षित आहे. तेथे पर्यटक वाढले आहेत, हा विचार करून आम्ही तेथे पर्यटनाला गेलो. फक्त निरपराध पर्यटकांवर हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांना, आमच्या बाबा आणि दोन्ही काकांना मारणाऱ्या दहशतवाद्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे. आम्हाला सरकारकडून न्याय मिळाला पाहिजे, अशी अपेक्षा ऋचा मोने हिने व्यक्त केली. ऋचा सद्या बारावीत शिक्षण घेत आहे. तिचे बाबा अतुल मोने मध्य रेल्वेच्या माटुंगा येथील कार्यशाळेत विभागीय अभियंता म्हणून नोकरी करत होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news