

ठाणे : उद्धव ठाकरे शिवसेनेतील सहा खासदारांचे पुढे आलेले बंड ही घटना आताची असली तरी त्याची पूर्वतयारी तीन महिने आधीपासून सुरू होती. त्याची सगळी सूत्रे होती खासदार श्रीकांत शिंदे यांच्याकडे. याच मोहिमेसाठी त्यांचे राज्यभर दौरेही सुरू होते. प्रत्येक खासदाराशी स्वतंत्र चर्चा आणि प्रत्येकाशी वेगळे डिल या वाटाघाटीतूनच हे ‘ऑपरेशन टायगर’ फळाला आले आहे.
दिल्लीचे विशेष अधिवेशन संपले आणि अडलेल्या विधेयकांची चर्चा देशात सर्वदूर सुरू राहिली. विरोधक जिंकल्याचा आनंदोत्सव करीत होते, त्याचवेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र खासदार श्रीकांत शिंदे महाराष्ट्रात दौरे करत होते. ठाकरे सेनेच्या खासदारांच्या भेटीगाठी आणि पुढच्या फुटीची तयारी सुरू झाली होती. सुरुवातीला ७ खासदारापर्यंतचे गणित जुळवले गेले होते. मात्र गुवाहाटीनंतर ‘५० खोके एकदम ओके’चा सुरू झालेला गजर आणि यातून फुटीरांची निर्माण होणारी इमेज ही गणिते लक्षात घेऊन फुटीसाठी सहजासहजी कुणी धजावत नव्हते.
पैशाची आमिषे आणि प्रत्येक खासदारांचा लो फॉल मुद्यांचा अभ्यास आणि कुणाला कुठल्या भाषेत सांगितल्यावर तो फुटीला राजी होईल याचा इत्थंभूत अभ्यास करून फुटीची ३ महिन्यांनंतर तयारी सुरू झाली. सर्व खासदारांकडून लेखी शब्द घेतल्यानंतर याची खरी कार्यवाही करण्यासाठी एकनाथ शिंदे आणि श्रीकांत शिंदे मैदानात उतरले. तेव्हाचे मुख्यालय गुवाहाटी होते तर आत्ताचे मुख्यालय राजस्थान आहे.
एकाच पक्षात वारंवार पडणारी फूट यातील कच्चे दुवे नेमके काय, असा प्रश्न सतावतो आहे. भाजपला लोकसभा आणि राज्यसभेत दोन तृतीयांश बहुमताचा आकडा जुळवायचा आहे. त्यासाठी राज्यसभेत १६३ मते हवी आहेत आणि लोकसभेचेही गणित जुळवायचे आहे. त्यामुळे तृणमूलनंतर पहिला प्रहार हा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटावर करण्यात आला आहे. कुणी मनाने तर कुणी भीतीपोटी या बंडात सहभागी झाले आहेत. अधिवेशनानंतर ६ खासदारांचे विलीनीकरण करायचे आहे, यासाठी दिल्लीत जोरदार तयारी सुरू आहे. शिंदे पिता-पुत्रांनी या विलीनीकरणासाठी सर्व नियोजन पक्के केले आहे. ओमराजे निंबाळकर यांच्यासारखा सच्च्या दिलाचा खासदार या बंडात असल्याने त्याची चर्चा अधिक रंगते आहे.
६ खासदार राजस्थानच्या हॉटेलमध्ये
तीन दिवसांपूर्वी काय उंट... काय पॅलेस म्हणून ६ खासदार राजस्थानच्या पॅलेस संस्कृतीत दाखल झाले आहेत. पुढची जोडणी सुरू आहे. या बंडात कुणी कुणावर विश्वास ठेवायचा असा प्रश्न उपस्थित होत आहे. खासदार अरविंद सावंत, संजय राऊत आणि अनिल देसाई हे ठाकरे गटाच्या बाजूने किल्ला लढवत आहेत. खासदारांचा नवा गट, तांत्रिक मान्यता या बाबींवर वकिलांची फौज काम करत आहे. दिल्लीत एकनाथ शिंदेंचे वजन वाढत असल्याने प्रदेश भाजपमध्ये अस्वस्थता आहे. ऑपरेशन टायगर कसे यशस्वी होईल याबद्दल अनेक शंकांचे काहूर असले तरी मोहीम फत्ते करण्यासाठी प्रयत्न सुरू आहे. दुसऱ्या बाजूला ठाकरेंचे मन वळविण्यासाठीही प्रयत्न सुरू असल्याचे सांगितले जाते. नक्की काय होणार हे पुढील ८ दिवसात उमजेल, तोपर्यंत अन्ववार्थ काढणे सुरूच राहील.