

कल्याण : काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या अतिरेकी हल्ल्यात नाहक बळी गेलेल्या 28 पर्यटकांच्या मृत्यूनंतर भारत सरकारने ऑपरेशन सिंदूर अंतर्गत पाकिस्तान अधिकृत काश्मीरमधील सात शहरांतील नऊ अतिरेकी तळांवर हवाई हल्ला करत त्यांना नेस्तनाबूत केले आहे.
या कारवाईबाबत डोंबिवलीतील हुतात्मा संजय लेले यांचे पुत्र हर्षल लेले यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की, “भारत सरकारने अतिरेक्यांच्या अड्ड्यांवर हल्ला करून त्यांच्या मरणाचा बदला घेतला. त्यामुळे माझ्या वडिलांच्या व इतर 27 हुतात्म्यांच्या आत्म्याला नक्कीच शांती लाभली असेल. माझी भारत सरकारकडे विनंती आहे की, अशा सर्व अतिरेक्यांचा खात्मा करावा.”
हल्ल्यात हुतात्मा झालेल्या अतुल मोने यांची पत्नी म्हणाल्या, “भारत सेनेने नऊ अतिरेकी तळांवर मिसाईल हल्ले केल्याचे ऐकून समाधान वाटले. पहलगाममध्ये अतुलसह 27 जणांनी बलिदान दिले. भारत सरकारने जो बदला घेतला त्याबद्दल आम्ही आभार मानतो. अतिरेक्यांचे मूळ नष्ट व्हावे, अशी आमची इच्छा आहे.”
अतुल मोने यांची मुलगी म्हणाली, “आम्हाला रात्री तीनच्या सुमारास माहिती मिळाली की भारताने पाकिस्तानवर मिसाईल हल्ला केला. हे ऐकून आम्हाला खूप आनंद झाला. पहलगाममध्ये जे काही घडले, त्यावर भारताने तातडीने कारवाई केली. ऑपरेशन सिंदूर हे यशस्वी ठरले असून पुढील कारवाई ही अशाच पद्धतीने होऊन आम्हाला न्याय मिळावा, हीच आमची इच्छा आहे.” भारत सरकारच्या या ठोस कारवाईमुळे डोंबिवलीकर नागरिकांनी भारतीय वायुसेनेचे आभार मानले.