

सावंतवाडी : बांदा शहरा जवळील डेगवे गावात एका पट्टेरी थेट चालत्या दुचाकीवर हल्ला केला. यात दुचाकीस्वार राजेश नारायण देसाई (42), त्यांची पत्नी वर्षा (36) व मुलगा कु. समर्थ (10) असे तिघे जखमी झाले. सुदैवाने यानंतर वाघाने तेथून पळ काढल्याने देसाई कुटुंबियांच्या जीवावरील संकट टळले. अंगाचा थरकाप उडविणारी ही घटना डेगवे-वराडकरवाडी रस्त्यावर शुक्रवारी (दि.6) रात्री 8.30 वा.च्या सुमारास घडली. जखमी तिघांवरही सावंतवाडी शहरातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
शुक्रवारी (दि.6) मळगाव येथील श्री देव भूतनाथ मंदिरात वार्षिक जत्रोत्सव होता. या जत्रोत्सवासाठी राजेश देसाई हे पत्नी सौ. वर्षा व मुलगा समर्थ यांच्यासह शुक्रवारी सायंकाळी दुचाकीने गेले होते. रात्री ते जत्रोत्सवानंतर पुन्हा घरी परतत होते. त्यांची दुचाकी डेगवे-वराडकरवाडी रस्त्यावर आली असता रस्त्यालगतच्या झाडीतून पट्टेरी वाघाने थेट त्यांच्या चालत्या दुचाकीवर झेप घेतली. यामुळे श्री. देसाई हे कुटुंब मोटरसायकलसह रस्त्यावर कोसळले. सुदैवाने यानंतर वाघ ते थून पसार झाल्याने देसाई कुटुंबियांच्या जीवावरील संकट टळले.
मोटरसायकलसह रस्त्यावर आदळल्याने राजेश देसाई यांचा हात फ्रॅक्चर झाला तर पत्नी व मुलगा यांच्याही अंगावर गंभीर जखमा झाल्या आहेत. श्री. देसाई यांनी प्रसंगावधान राखत श्री. देसाई यांनी मोबाईलद्वारे या घटनेची माहिती ग्रामस्थांना दिली. वाघाच्या हल्लाची माहिती मिळताच गावातील लोकांनी घटनास्थळी धाव घेतली. मधुकर देसाई, राजन देसाई, चंद्रकांत नाईक यांनी जखमी देसाई कुटुंबाला तात्काळ सावंतवाडी येथील रूग्णालयात दाखल केले.