

नेवाळी : एमआयडीसीच्या काटई पाईपलाईन अंबरनाथ महामार्गावरील नेवाळी नाका परिसर गेल्या पाच दिवसांपासून जलमय झाला आहे. हजारो वाहनचालक आणि कामगारांना जीव मुठीत धरून पाण्यातून मार्ग काढावा लागत आहे. मात्र या गंभीर समस्येकडे संबंधित प्रशासनाबरोबरच लोकप्रतिनिधींनीही पाठ फिरवल्याने नागरिकांमध्ये तीव्र संतापाची भावना व्यक्त होत आहे.
काटई नाका मार्गे तळोजा, डोंबिवली, अंबरनाथ, आनंदनगर आणि बदलापूर या प्रमुख औद्योगिक शहरांना जोडणारा हा अत्यंत महत्त्वाचा महामार्ग आहे. दररोज हजारो कामगार, कर्मचारी, विद्यार्थी आणि नागरिक या मार्गाचा वापर करतात. मात्र मुसळधार पावसानंतर साचलेले पाणी पाच दिवस उलटूनही हटविण्यात प्रशासनाला अपयश आले आहे. परिणामी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागत असून अनेक दुचाकीस्वारांना पाण्यातून वाहने ढकलत प्रवास करावा लागत आहे.
कल्याण लोकसभा मतदारसंघ आणि कल्याण पूर्व विधानसभा क्षेत्रातील हा भाग असूनही स्थानिक लोकप्रतिनिधींकडून प्रत्यक्ष पाहणी, पाठपुरावा किंवा ठोस उपाययोजना झाल्याचे दिसून येत नाही. लोकप्रतिनिधींच्या निष्क्रियतेमुळे संबंधित विभागातील अधिकारीही या समस्येकडे कानाडोळा करत असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे.त्यामुळे आणखी किती दिवस जलमय महामार्गावरून धोकादायक प्रवास करायचा असा प्रश्न वाहनचालकांसमोर उभा ठाकला आहे.
गेल्या दोन वर्षणापासून नेवाळी नाका परिसर जलमय होण्याची समस्या कायम असतानाही कायमस्वरूपी निचरा व्यवस्था उभारण्यात आलेली नाही. कोट्यवधी रुपयांची काँक्रिटीकरणाची विकासकामे आणि आश्वासने दिली जात असताना नागरिकांना मात्र आजही पाण्यातूनच प्रवास करावा लागत असल्याची संतप्त प्रतिक्रिया स्थानिक नागरिक व्यक्त करत आहेत. कोणतीही मोठी दुर्घटना घडण्यापूर्वी या मार्गावरील पाणी तातडीने हटवून कायमस्वरूपी जलनिस्सारणाची प्रभावी व्यवस्था उभारावी, अशी जोरदार मागणी नागरिकांकडून होत आहे. अन्यथा नागरिकांच्या रोषाला प्रशासनासह लोकप्रतिनिधींनाही सामोरे जावे लागेल, असा इशाराही स्थानिकांनी दिला आहे.