

पालघर/विरार : सरत्या 2024 वर्षाला निरोप देत नववर्षाचे जल्लोषात स्वागत करण्यासाठीचा ठाणेसह पालघर जिल्ह्यात उत्साह दिसून येत आहे. वसईसह पालघर, डहाणू किनारी पर्यटन स्थळे पर्यटक, पाहुण्यांच्या स्वागताला सज्ज झाली आहेत. हॉटेल्स, रेस्टॉरेन्टसह धाबे हाऊ स फुल्ल झाली असून कोणतेही अनुचित प्रकार घडू नये म्हणून ठिकठिकाणी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. तळीरामांवर पोलीस प्रशासनाचा वॉच असणार आहे.
वसईतील पश्चिम किनारपट्टी, हॉटेल्स, रिसॉर्ट्स आणि धाब्यांवर जल्लोषासाठी प्रचंड गर्दी होण्याची शक्यता आहे. पर्यटकांच्या वाढत्या गर्दीमुळे पोलीस यंत्रणा सतर्क झाली असून, कोणत्याही अनुचित प्रकारांना आळा घालण्यासाठी व्यापक बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
वसईतील पश्चिम किनारपट्टी विशेषता हॉटेल्स आणि रिसॉर्ट पर्यटकांची पहिली पसंती बनली आहे. नववर्षाच्या जल्लोषासाठी हे ठिकाण आधीच बुक झाले असून, मंगळवारी येथे अक्षरशा पर्यटकांचा मेळा फुलणार आहे. बहुतेक पर्यटकांनी रविवार (दि.29) पासूनच नवीन वर्षाच्या स्वागतासाठी पार्टी आयोजित केल्या आहेत. मंगळवार (दि.31) उपासाचा दिवस असूनही पर्यटकांनी सेलिब्रेशन साठी हाच दिवस निवडला आहे. रिसॉर्ट्स मध्ये हाउसफुल्ल ची स्थिती असून, स्थानिक व्यापार्यांनाही मोठा लाभ होत आहे.
नववर्षाच्या सेलिब्रेशन साठी मद्यपानाला प्राधान्य दिले जात असल्याने वसईतील बियर आणि वाईन शॉप मध्ये स्टॉक चा पुरवठा वाढवण्यात आला आहे. मटन, चिकन आणि मासे यासाठी स्थानिक विक्रेत्यांकडे गर्दी वाढली असून, रविवारी (दि.29) देखील या पदार्थांच्या खरेदीसाठी लांब रांगा लागल्या होत्या.
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी वसई पोलीस सज्ज आहेत. रिसॉर्ट मालकांना विशेष सूचना देण्यात आल्या असून, कोणताही अनुचित प्रकार रोखण्यासाठी आणि मद्यपी वाहन चालकांवर कारवाई करण्यासाठी पथक तैनात करण्यात आले आहे. नववर्षाच्या जल्लोषाला कोणताही विघ्न येण्यासाठी प्रत्येक कोपर्यावर नजर ठेवण्यात येणार आहे.
नववर्षाच्या उत्सवासाठी वसईच्या हॉटेल्स रिसॉर्ट्स किनारपट्टी आणि धाब्यांवर सगळीकडे चैतन्य जाणवते. सुरक्षिततेसह जल्लोषाच्या वातावरणाला वसई सुरुवात झाली आहे. मंगळवारी (दि.31) वसईतील रस्ते किनारपट्टी आणि रिसॉर्ट पर्यटकांनी गजबजलेले असतील.