

मुंबई : नवी मुंबईतील वाढते नागरीकरण, लोकसंख्या वाढ, वाहतुकीचे द्रुतगतीने वाढणारे आव्हान आणि कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने प्रभावी नियंत्रण ठेवण्यासाठी महाराष्ट्र शासनाने नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाची मोठ्या प्रमाणावर पुनर्रचना करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार विद्यमान दोन परिमंडळांची विभागणी करून तीन नवीन परिमंडळांची रचना करण्यात येणार आहे.
नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाची स्थापना 19 नोव्हेंबर 1994 रोजी करण्यात आली होती. त्यावेळी परिमंडळ-1 आणि परिमंडळ-2 अशी दोनच परिमंडळे कार्यरत होती. त्यामध्ये वाशी, तुर्भे, पनवेलसारख्या महत्त्वाच्या भागांचा समावेश होता. याशिवाय पनवेल तालुका पोलीस ठाणे रायगड जिल्ह्यातून वेगळे करून 15 जून 2006 रोजी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयात समाविष्ट करण्यात आले होते.
त्या काळात या विभागातील लोकसंख्या आणि वाहतूक तुलनेने कमी असल्याने दोन परिमंडळांद्वारे संपूर्ण क्षेत्रावर देखरेख ठेवणे शक्य होते. परंतु गेल्या दोन दशकांमध्ये नवी मुंबई शहराची लोकसंख्या 58 ते 60 लाखांपर्यंत पोहोचली आहे. रस्ते, बंदरे, औद्योगिक वसाहती, शैक्षणिक संस्था तसेच व्यापारी उपक्रमांमुळे या क्षेत्रातील कायदा व सुव्यवस्था राखणे मोठे आव्हान बनले आहे. वाशी, बेलापूर, नेरुळ, उरण, न्हावाशेवा, पनवेल, तळोजा, कळंबोली आणि इतर गजबजलेल्या भागांमध्ये वाढलेल्या वाहतूक कोंडी, गुन्हेगारी आव्हाने आणि औद्योगिक सुरक्षेच्या गरजा लक्षात घेता विद्यमान दोन परिमंडळांचे कामकाज प्रचंड वाढले आहे.
यामुळे महाराष्ट्र शासनाने उच्चस्तरीय चर्चा आणि सर्व संबंधित विभागांच्या सल्लामसलतीनंतर नवी मुंबई पोलीस आयुक्तालयात तिसरे परिमंडळ निर्माण करण्याचा निर्णय घेतला आहे. शासनाच्या 23 जुलै 2025 रोजीच्या निर्णयानुसार आता नवी मुंबई पोलीस आयुक्तालयांतर्गत परिमंडळ-1 वाशी, परिमंडळ-2 बेलापूर आणि परिमंडळ-3 पनवेल अशी नवी रचना करण्यात येणार आहे.
नवी मुंबई पोलीस आयुक्तालय सध्या 688 चौरस किलोमीटरच्या प्रचंड क्षेत्रावर काम करते. या क्षेत्रात उद्योग, आयटी कंपन्या, शैक्षणिक संस्था, मोठे मॉल्स, तसेच जपान, जर्मनीसारख्या अनेक परदेशी गुंतवणूकदारांच्या कंपन्याही आहेत. यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर सुरक्षेची हमी देणे हे पोलीस यंत्रणेसाठी महत्त्वाचे झाले आहे. बेलापूरमध्ये वाढत्या सरकारी कार्यालये, सीबीडीचे व्यापारी व्यवहार, तसेच न्यायालयीन आणि प्रशासकीय महत्त्व लक्षात घेता बेलापूरमध्ये स्वतंत्र परिमंडळाची आवश्यकता होती.
गेल्या काही वर्षांत बेलापूरमध्ये अनेक महत्त्वाच्या सरकारी संस्था आणि खासगी उद्योगांनी विस्तार केला आहे. बेलापूरचा सीबीडी क्षेत्र हा केवळ नवी मुंबईचाच नाही, तर संपूर्ण रायगड आणि ठाणे जिल्ह्याच्या दृष्टीने महत्त्वाचा ठरतो. येथे वाढत्या वाहतूक समस्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी, सायबर गुन्ह्यांवर देखरेख ठेवण्यासाठी आणि गुन्हेगारीवर वेगाने कारवाई करण्यासाठी स्वतंत्र परिमंडळाची स्थापना नागरिकांसाठी दिलासादायक ठरणार आहे.
नवी मुंबईतील कायदा आणि सुव्यवस्था सुरळीत ठेवण्यासाठी ही पुनर्रचना अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे. नवी मुंबई पोलीस आयुक्तालयातील अधिकारी व कर्मचारी आता कामकाज अधिक सुटसुटीत व प्रभावीपणे हाताळू शकतील. बेलापूर परिमंडळ कार्यान्वित झाल्यानंतर वाशी आणि पनवेल परिमंडळांवरील कामाचा भार कमी होणार असून गुन्हेगारीवर अधिक प्रभावी नियंत्रण मिळवणे सोपे होईल.
परिमंडळ-2 बेलापूरसाठी पोलीस उपआयुक्त-1 व सहाय्यक पोलीस आयुक्त-2 अशी एकूण 3 नवीन पदे निर्माण करण्यात येणार आहेत. या पदांसाठी येणारा अंदाजे 38 लाख 18 हजार 580 रुपयांचा खर्च शासनाच्या मंजूर अनुदानातून भागविण्यात येणार आहे. या निर्णयाला पोलीस महासंचालकांच्या प्रस्तावावर आधारित उच्चस्तरीय सचिव समितीच्या बैठकीत याला हिरवा कंदील मिळाला होता.