

डोंबिवली : नीट-युजी २०२६ पेपरफुटी प्रकरणाचा तपास करणारा केंद्रीय अन्वेषण विभाग अर्थात सीबीआय आता कल्याणमध्ये दाखल झाला आहे. कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर असलेल्या म्हारळ परिसरात राहणाऱ्या एका विद्यार्थीनीच्या घरी जाऊन सीबीआयच्या पथकाने तिचा जबाब नोंदविल्याचे वृत्त आहे.
या संदर्भात सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सीबीआयच्या चौकशी पथकाने शुक्रवारी म्हारळ परिसरातील एका विद्यार्थीनीच्या घरी भेट दिली. जवळपास दोन तास या विद्यार्थीनीसह तिच्या कुटुंबीयांची विचारपूस करण्यात आली. सदर विद्यार्थीनी नाशिकमधील एका दुसऱ्या विद्यार्थीनीच्या संपर्कात होती. नाशिकच्या विद्यार्थीनीचे नाव पेपरफुटी प्रकरणात आल्याने तपासाची साखळी कल्याणपर्यंत पोहोचली.
या संदर्भात संबंधित विद्यार्थीनीच्या वडिलांशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले, माझी मुलगी नाशिकच्या एका विद्यार्थीनीच्या संपर्कात होती. तिचा मोबाईल क्रमांक तपास यंत्रणेकडे गेल्याने त्या अनुषंगाने आमची विचारपूस झाली आहे. यापेक्षा अधिक बोलण्यास त्यांनी नकार दिला. या विद्यार्थीनीचा आणि तिच्या वडिलांचा पेपरफुटी प्रकरणाशी थेट संबंध काय, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र सीबीआयचे पथक थेट घरी आल्याने कल्याणमध्ये एकच खळबळ उडाली आहे.
प्रकरणाची पार्श्वभूमी
३ मे २०२६ रोजी घेण्यात आलेल्या नीट-युजी परीक्षेचा पेपर फुटल्याचा आरोप झाल्यानंतर केंद्र सरकारने हे प्रकरण सीबीआयकडे सोपवले होते. तपासात समोर आले की, एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात पुण्यात काही विद्यार्थ्यांसाठी विशेष शिकवणी वर्ग घेण्यात आला होता. तिथे परीक्षेत येणारे प्रश्न आधीच सांगण्यात आले होते. या प्रकरणाचा मुख्य सूत्रधार पी. व्ही. कुलकर्णी या निवृत्त रसायनशास्त्र प्राध्यापकाला पुण्यातून अटक झाली आहे. राष्ट्रीय परीक्षा संस्थेच्या प्रक्रियेत सहभागी असल्याने त्याला प्रश्नपत्रिका मिळत होत्या, असा सीबीआयचा दावा आहे. आतापर्यंत जयपूर, गुरूग्राम, नाशिक, पुणे आणि अहिल्यानगर येथून सात आरोपींना अटक झाली आहे. यापूर्वी नांदेडमधील दोन शिकवणी वर्गांचीही झाडाझडती घेण्यात आली होती.
विद्यार्थीनीकडून धागेदोरे मिळण्याची शक्यता
सीबीआयकडून जप्त केलेल्या मोबाईल आणि कॉम्प्युटरची न्यायवैद्यक तपासणी सुरू आहे. विद्यार्थ्यांपर्यंत पेपर पोहोचविणाऱ्या संपूर्ण जाळ्याचा शोध सुरू आहे. कल्याणमधील विद्यार्थीनीच्या जबाबानंतर तपासाला नवे धागेदोरे मिळण्याची शक्यता आहे. या प्रकरणात आणखी काही नावे समोर येऊ शकतात, असे तपास यंत्रणांचे म्हणणे आहे. दरम्यान, पेपरफुटीच्या आरोपांमुळे ३ मे ची नीट-युजी २०२६ परीक्षा रद्द करण्यात आली होती. सीबीआयच्या अधिकृत पत्रकानंतरच कल्याणच्या म्हारळमधील कारवाईबाबत पूर्ण स्पष्टता येईल.