

डोंबिवली : डोंबिवली शहराला जोडणारे रस्ते एमआयडीसीमधील घरडा सर्कल चौकात मिळतात. या चौकाचे सुशोभीकरण करण्याचे काम सुरू आहे. मात्र सुशोभीकरणासाठी चौकातील लहान-मोठ्या अन्य झाडांसह कडुलिंबाची अशरक्ष: खांडोळी करण्यात आल्याने पर्यावरणप्रेमींनी संताप व्यक्त केला जात आहे.
या चौकाच्या मध्यावर सुशोभिकरण करण्यासाठी काही वर्षांपूर्वी फेज 1 मधील घरडा केमिकल्स लिमिटेड या कंपनीने पुढाकार घेतला. चौकातील मध्यावर कारंजे आणि पाण्याच्या धबधब्या शिवाय आजुबाजुला छोटी-मोठी झाडे लावून अतिशय सुंदर असे सुशोभीकरण केले होते. कालांतराने कंपनीने किंवा कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेने देखभाल-दुरूस्तीकडे दुर्लक्ष केल्याने, तसेच सदर सुशोभीकरण केलेल्या चौकाभोवती नेत्या-पुढाऱ्यांच्या वाढदिवसा निमित्त त्यांना शुभेच्छा देणाऱ्या फलकांसह जाहिरातींचेही फलक लागत असतात. त्यामुळे या चौकाचे विद्रूपीकरण झाले होते.
सद्या या सर्कलचे पुन्हा सुशोभीकरण करून तेथे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभा करण्याचे काम सुरू आहे. ही डोंबिवलीकरांसाठी अतिशय स्पृहणीय बाब आहे. परंतु तेथे आधी असलेली व अडसर न ठरणारी झाडे तोडणे चुकीचे असल्याचे मत डोंबिवली वेल्फेअर असोसिएशनचे सचिव राजू नलावडे यांनी व्यक्त केले आहे. बुधवार दुपारी याच सर्कलमधील कडुलिंबाच्या मोठ्या झाडासह अन्य छोटी झाडे सुशोभीकरण नावाखाली तोडण्यात आली.
वास्तविक पाहता कडुलिंबाच्या झाडाचा अडसर सुशोभीकरण आणि वाहतुकीसाठी येत नव्हता. त्यामुळे अनेकांनी सामाजिक माध्यमांवर याबद्दल नापसंती व्यक्त केली आहे. हे झाड तोडण्यासाठी रितसर परवानगी घेतली होती का ? अशी झाडे तोडण्याबाबत अनेक नियमावली असून त्यांचे पालन केले होते का ? असे अनेक प्रश्न विचारले जात आहेत. आता प्रशासन सांगेल की आम्ही त्याजागी अनेक झाडे लावून घेऊ. परंतु हे आधी असलेले कडुलिंबाचे उंच वाढलेले किंमती झाड वाढविण्यास अनेक वर्ष जावी लागली असल्याने याचाही प्रशासनाने विचार करायला हवा होता. आता हे झाड तोडून परत त्याला जीवदान देता येणार नाही. परंतु यापुढे या चौकाचे सुशोभीकरण झाल्यानंतर त्याच्या भोवती राजकिय पुढारी, दादा, भाईंच्या वाढदिवसा निमित्त शुभेच्छा देणारे फलक लावण्यास मज्जाव करावा. चौकाचे विद्रूपीकरण करणार्यांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी डोंबिवली वेल्फेअर असोसिएशनचे सचिव राजू नलावडे यांनी केली आहे.